Pro Kabaddi:पवन सेहरावत ठरला प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 01:38 PM2022-08-06T13:38:19+5:302022-08-06T13:44:07+5:30
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे.
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या (PKL) नवव्या हंगामाला लवकरच सुरूवात होणार आहे. या लीगसाठी मुंबईत खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यावर्षी तब्बल ५०० हून अधिक खेळाडू लिलावात सहभागी झाले आहेत. नवव्या हंगामासाठी खेळाडूंचा होणारा लिलाव ५ ते ६ ऑगस्टदरम्यान मुंबईत पार पडत आहे. सध्या सुरू असलेल्या लिलाव प्रक्रियेत पवन सेहरावत प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला तमिळ थलायवासच्या संघाने तब्बल २.२६ कोटींमध्ये खरेदी केले आहे. तर विकास खंडोलाला बंगळुरू बुल्सच्या संघाने १.७ कोटी रूपयांना खरेदी केले आहे, तो या हंगामातील दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला आहे.
सर्वात महागडा विदेशी खेळाडू
दरम्यान, पुणेरी पलटणने इराणचा कबड्डीतील दिग्गज फजल अत्राचलीला १.३८ कोटींमध्ये खरेदी केले. तो आतापर्यंतचा सर्वात महागडा बचावपटू आणि परदेशी खेळाडू ठरला आहे. २०१८ च्या प्रो कबड्डी लीगच्या लिलावात यु मुंबाने १ कोटींमध्ये अत्राचलीला खरेदी केले होते.
तर प्रो कबड्डी लीगच्या एतिहासातील सर्वात यशस्वी चढाईपटूंपैकी एक असलेला प्रदीप नरवाल यूपी योद्धाच्या संघात परतला आहे. या लिलावाची प्रक्रिया अद्याप सुरू असून लिलावात विदेशी खेळाडूंसह भारतातील युवा खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. ए, बी, सी, डी या श्रेणींमध्ये अष्टपैलू (Allrounder), बचावपटू (Defender) आणि चढाईपटू (Raider) यानुसार खेळाडूंना विभागले जाईल.
खेळाडू | संघ | पोझिशन | किंमत |
पवन कुमार सेहरावत | तमिळ थलायवास | चढाईपटू | २.२६ कोटी |
फजल अत्राचली | पुणेरी पलटण | बचावपटू | १.३८ कोटी |
विकास खंडोला | बंगळुरू बुल्स | चढाईपटू | १.०७ कोटी |
प्रदीप नरवाल | यूपी योद्धा | चढाईपटू | ९० लाख |
मोहम्मद इस्माईल नबीबक्ष | पुणेरी पलटण | अष्टपैलू | ८७ लाख |
सचिन | पाटणा पायरेट्स | चढाईपटू | ८१ लाख |
मंजीत | हरयाणा स्ट्रेलर्स | चढाईपटू | ८० लाख |
अजिथ वी कुमार | जयपूर पिंक पॅंथर्स | बचावपटू | ६६ लाख |
परवेश भैंसवाल | तेलगु टायटंस | बचावपटू | ६२ लाख |
अभिषेक सिंग | तेलगु टायटंस | चढाईपटू | ६० लाख |
सुरजित सिंग | तेलगु टायटंस | बचावपटू | ५० लाख |
दीपक निवास हुड्डा | बंगाल वॉरियर्स | अष्टपैलू | ४३ लाख |
संदीप कुमार | दबंग दिल्ली | बचावपटू | ४० लाख |
रोहित गुलिआ | पाटणा पायरेट्स | अष्टपैलू | ३० लाख |