पवार-श्रीनिवासन युती नकोच
By admin | Published: September 27, 2015 12:14 AM2015-09-27T00:14:50+5:302015-09-27T00:14:50+5:30
जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत कोण बसेल, यावरून खलबते सुरू झाली असताना शरद पवार आणि एन. श्रीनिवासन हे कुठल्याही स्थितीत एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्या
नवी दिल्ली : जगमोहन दालमिया यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या खुर्चीत कोण बसेल, यावरून खलबते सुरू झाली असताना शरद पवार आणि एन. श्रीनिवासन हे कुठल्याही स्थितीत एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्या, असा आग्रह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली तसेच बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी पवार गटाचे विश्वासू अॅड. शशांक मनोहर आणि अजय शिर्के यांना केला.
अध्यक्षपदाचा उमेदवार सर्वसंमतीने निवडण्याच्या मोहिमेत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष मनोहर आणि माजी कोशाध्यक्ष शिर्के यांनी जेटली यांची निवासस्थानी भेट घेतली. या वेळी अनुराग ठाकूरदेखील उपस्थित होते.
पवार-श्रीनिवासन यांच्यात अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या दिलजमाईबद्दल या भेटीत चिंता व्यक्त करण्यात आली. बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले, की जेटलींच्या घरी मनोहर आणि शिर्के यांच्यासोबत चर्चा झाली. प्रसिद्ध वकील असलेले मनोहर यांची ओळख स्वच्छ प्रतिमेचे आणि बोर्डात भ्रष्टाचाराला थारा न देणारे, अशी आहे. त्यांना पुन्हा अध्यक्ष बनण्याची गळ घालण्यात आली; पण त्यांनी जेटली, ठाकूर आणि शिर्के यांची विनंती मान्य केली नाही.
मनोहर म्हणाले, ‘‘बीसीसीआयचा प्रमुख म्हणून मी पद भूषविले आहे. दुसऱ्यांदा या पदावर विराजमान होण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तथापि, बोर्डातील सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासाठी बीसीसीआयची मदत करण्यास मी तयार आहे. मी स्वत: पवार-श्रीनिवासन यांच्यातील युतीच्या विरुद्ध आहे.’’
जेटली आणि ठाकूर यांनीदेखील मनोहरांना पवारांची श्रीनिवासन यांच्याशी जवळीक होऊ देऊ नका, असा आग्रह धरल्याचे समजते. केवळ सहा महिन्यांआधी श्रीनिवासन यांना बीसीसीआयमधून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष केला. आता तेच श्रीनिवासन पवार यांच्या पाठिंब्याने बीसीसीआय अध्यक्ष बनणार असतील, तर क्रिकेट चाहत्यांच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे श्रीनिवासन यांच्यापासून चार हात दूर राहण्यासाठी पवारांचे मन वळविण्याचा आग्रह या मंडळींनी मनोहरांकडे चर्चेदरम्यान केला.
शिर्के हे बीसीसीआयचे सर्वश्रेष्ठ कोशाध्यक्षांपैकी एक आहेत. त्यांची प्रतिमा कठोर, पण स्वच्छ राहिली. २०१३च्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीत जावई गुरुनाथ मयप्पन याचे नाव आल्यानंतरही श्रीनिवासन हे राजीनामा देण्यास तयार नाहीत, असे दिसताच विरोध म्हणून त्यांनी स्वत: कोशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा २०१४ ते २०१७ या कालावधीत पूर्व विभागाकडे आहे. दालमिया यांच्यानंतर अध्यक्षपदाचे नाव पूर्व विभागाला सादर करायचे आहे. झारखंडचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना या पदासाठी संधी देण्याचा पूर्व विभागाचा विचार आहे. अशा वेळी पवार किंवा शिर्के यांचे नाव पुढे आल्यास पूर्व विभागातील बीसीसीआयचे प्रतिनिधी कशी प्रतिक्रिया व्यक्त करतील, हे अद्याप गुलदस्तात आहे.
------
च्ठाकूर हे स्वत: पवारांना दुसऱ्यांदा अध्यक्ष बनविण्याच्या विरोधात नाहीत. पवार आणि ठाकूर गटाकडे आवश्यक मताधिक्य आहेच. मनोहर यांच्याप्रमाणे पवार यांनीही आग्रह नाकारला, तर शिर्के यांनादेखील अध्यक्ष बनविण्याची तयारी असेल. राजीव शुक्ला हे मात्र या पदासाठी सर्वसंमती असलेले उमेदवार नाहीत.(वृत्तसंस्था)