पवारांचा राजीनामा मंजुरी अनिवार्य

By admin | Published: January 3, 2017 12:52 AM2017-01-03T00:52:10+5:302017-01-03T00:52:10+5:30

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळातून (बीसीसीआय) हकालपट्टी केल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली

Pawar's resignation mandatory mandatory | पवारांचा राजीनामा मंजुरी अनिवार्य

पवारांचा राजीनामा मंजुरी अनिवार्य

Next

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळातून (बीसीसीआय) हकालपट्टी केल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठी खळबळ उडाली. भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतही याचे मोठे पडसाद उमटले असून, मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) लवकरच आपली तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिलेला राजीनामा यावेळी स्वीकारण्यात येईल, असे संकेतही मिळाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर खळबळ माजल्यानंतर एमसीए पुढील काही दिवसांत तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ७० वर्षांवरील व्यक्ती क्रिकेट प्रशासनामध्ये कार्यरत राहू शकत नाही, या लोढा समितीच्या काही महत्त्वाच्या शिफारशींपैकी एक असलेल्या शिफारशीनुसार गेल्याच महिन्यात एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आम्ही अजूनही पवार यांचा राजीनाम स्वीकारला नसल्याची प्रतिक्रिया एमसीएकडून मिळाली होती.
त्यामुळेच, सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर धास्तावलेल्या एमसीएकडून आपल्या बैठकीत पवार यांचा राजीनामा स्वीकारण्याचा एकमेव पर्याय असेल, अशी चर्चा आहे.

शिवाय, राज्य संघटनामध्ये कोणतीही व्यक्ती केवळ नऊ वर्षेच कार्यरत राहू शकते या शिफारशीनुसारही पवार यांना क्रिकेटपासून दूर राहणे अनिवार्य बनले होते. गेल्याच महिन्यात झालेल्या बैठकीत पवार यांनी आपला राजीनामा दिला होता. मात्र, एमसीएने तो स्वीकारला नव्हता. डिसेंबरच्या अखेरच्या काही दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय व संलग्न राज्य संघटनांना लोढा समितीच्या शिफारशी मान्य करण्याबाबत खडसावले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर काही दिवसांमध्येच एमसीएची तातडीची बैठक होऊन त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चर्चा केली जाईल, असे एमसीएच्या सूत्रांनी सांगितले.


सूत्रे कोणाकडे ?
पवार यांचा राजीनामा स्वीकारला जाणार हे निश्चित असताना त्यांच्यानंतर एमसीएची सूत्रे कोण सांभाळणार, अशी उत्सुकता लागली आहे. सध्या उपाध्यक्षपदी असलेले माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी नऊ वर्षांहून अधिक काळ एमसीएमध्ये पदाधिकारी म्हणून काम केले आहे, तर अन्य उपाध्यक्ष आशिष शेलार यांची पार्श्वभूमी राजकीय असून ते आमदार आहेत. विद्यमान खजिनदार नितीन दलाल यांचेही वय अधिक असून, सहसचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांच्याकडेही नऊ वर्षांहून अधिक काळ पदाधिकारी कार्याचा अनुभव आहे.

Web Title: Pawar's resignation mandatory mandatory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.