चांगल्या खेळाकडे लक्ष द्या : गावसकर
By admin | Published: August 16, 2015 10:42 PM2015-08-16T22:42:32+5:302015-08-16T22:42:32+5:30
श्रीलंकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीमध्ये विजयाच्या मार्गावर असताना चौथ्या दिवशी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला अनपेक्षितपणे पराभवाचे तोंड पाहावे
नवी दिल्ली : श्रीलंकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीमध्ये विजयाच्या मार्गावर असताना चौथ्या दिवशी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघाला अनपेक्षितपणे पराभवाचे तोंड पाहावे लागले. यामुळे भारताचे माजी महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला कठोर शब्दांत खडसावले असून, आक्रमक खेळ आणि खेळातील प्रयोगांवर होणाऱ्या चर्चा थांबवा आणि चांगल्या प्रकारे खेळ कसा होईल याकडे लक्ष द्या, असे सुनावले.
माझ्या मते आपण प्रायोगिक खेळ किंवा आक्रमक खेळावरील चर्चेला थांबवून खेळाकडे पुर्ण लक्ष देणे जरुरी आहे. खेळाचा पुरेपुर आनंद घेण्याची गरज आहे. आपण कशाप्रकारे क्रिकेट खेळणार आहोत, याविषयी इतरांना स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, असेही गावसकर यांनी सांगितले.
लंकेविरुध्दच्या पहिल्या कसोटीतील कामगिरीविषयी गावसकर यांनी सांगितले की, भारताच्या सर्वात निराशाजनक पराभवापैकी हा एक पराभव आहे. कारण मोठ्या आघाडीनंतर तुम्हाला विजयाची अपेक्षा असते. मात्र दुसऱ्या डावात भारताने लौकिकानुसार गोलंदाजी व फलंदाजी केली नाही. याव्यतिरीक्त पुढील दोन सामन्यांत बाजी मारुन भारतामध्ये मालिका विजयाची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)