पीबीएलमध्ये महिला दुहेरीकडे दुर्लक्ष
By admin | Published: December 17, 2015 01:30 AM2015-12-17T01:30:57+5:302015-12-17T01:30:57+5:30
एकेकाळी भारताच्या अव्वल दुहेरी महिला खेळाडू ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा यांनी भारतात दुहेरी खेळाडूंना जास्त महत्त्व दिले जात नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
नवी दिल्ली : एकेकाळी भारताच्या अव्वल दुहेरी महिला खेळाडू ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा यांनी भारतात दुहेरी खेळाडूंना जास्त महत्त्व दिले जात नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, आता भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या (बाई) वतीने होणाऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) स्पर्धेत ही बाब सिद्ध झाली आहे.
‘बाई’ने पूर्वीच्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) आयोजित केलेल्या पीबीएल स्पर्धेचे स्वरूप निश्चित केले असून, यामध्ये दोन पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी अशा लढतींचा समावेश आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे यामध्ये महिला दुहेरीचा समावेश नसून महिला खेळाडूंना कमी संधी आहे. त्यामुळेच एकूण स्पर्धेचे स्वरूप पाहताना
पुरुष खेळाडूंचे वर्चस्व राहण्याची स्पष्ट चित्रे आहेत.
जागतिक अजिंक्यपद कांस्यपदक विजेती आणि २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेची विजेती जोडी ज्वाला - आश्विनी यांनी सातत्याने महिला दुहेरी खेळाडूंकडे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एकेरी खेळाडूंच्या तुलनेत
दुहेरी खेळाडूंना सुविधा कमी
मिळतात, यावर त्यांचा अधिक भार होता. विशेष म्हणजे रिओ आॅलिम्पिकसाठी या दोन्ही अव्वल खेळाडूंचा केंद्र सरकारच्या ‘टॉप’ योजनेतही काहीसा उशिरा समावेश करण्यात आला होता. त्याच वेळी जागतिक क्रमवारीत त्यांच्याहून पिछाडीवर असलेल्या एकेरी
खेळाडूंचा मात्र लवकर समावेश करण्यात आला होता.
२ ते १७ जानेवारीदरम्यान आयोजन होणाऱ्या पीबीएलचे नवे स्वरूप मंगळवारी निश्चित करण्यात आले. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात पाच लढती होणार असून, यामध्ये पुरुषांना दोन एकेरी व एक दुहेरी व मिश्र दुहेरी लढत खेळण्याची
संधी असेल, तर महिलांना मात्र
एकेरी व मिश्र दुहेरी लढत खेळण्यास मिळेल. (वृत्तसंस्था)
नव्या वादाला जन्म...
जगभरात खेळल्या जाणाऱ्या सर्वच स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरी व दुहेरी, तसेच मिश्र दुहेरी अशा पाच लढती खेळविल्या जातात. पीबीएल स्पर्धेत जगभरातील अव्वल खेळाडू खेळणार आहेत. मात्र, तरीही ‘बाई’ने महिला दुहेरी गटाला वगळून विनाकारण वाद ओढावून घेतला आहे.