भारतावर बहिष्काराची पीसीबीची धमकी
By admin | Published: September 26, 2015 12:09 AM2015-09-26T00:09:29+5:302015-09-26T00:09:29+5:30
डिसेंबर महिन्यात प्रस्तावित द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी भारतातर्फे हिरवा कंदिल मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (पीसीबी) शहरयार खान यांनी
कराची : डिसेंबर महिन्यात प्रस्तावित द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी भारतातर्फे हिरवा कंदिल मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष (पीसीबी) शहरयार खान यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट स्पर्धांमध्ये
भारतावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.
स्थानिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत शहरयार म्हणाले, ‘डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रस्तावित मालिकेबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, पण बीसीसीआयने मालिका खेळण्यास नकार दिला तर आयसीसी व एसीसी सामन्यांमध्ये त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याशिवाय आमच्याकडे कुठला पर्याय शिल्लक राहणार नाही.’
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार उभय संघांदरम्यान डिसेंबरमध्ये मालिकेचे आयोजन होणार होते, पण अद्याप याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानतर्फे शस्त्रबंदी कराराचे उल्लंघन आणि पंजाबमधील गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उभय देशांदरम्यानच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलिकडेच दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र शक्य नसल्याचे वक्तव्य केले होते.
द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अपयशी ठरलेले शहरयार यांना याबाबत कडक भूमिका स्वीकारण्याचे जाहीर करताना म्हटले आहे की,‘गेल्या महिन्यात २८ आॅगस्ट रोजी बीसीसीआयला एक
पत्र पाठविण्यात आले होते, पण
त्याचे उत्तर अद्याप मला मिळालेले नाही. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी मालिका खेळण्यास नकार दिला तर आम्हाला पुढील कारवाईसाठी विचार करता येईल. बीसीसीआयकडून उत्तर मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल.’ (वृत्तसंस्था)
-------
पंजाबमधील गुरदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे उभय देशांदरम्यानच्या संबंधामध्ये तणाव निर्माण झाला आहे. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी अलिकडेच दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र शक्य नसल्याचे वक्तव्य केले होते.
------
दोन दिवसांपूर्वी शहरयार यांनी कडक भूमिका घेताना मालिकेसाठी भारताची मनधरणी करणार नसल्याचे स्पष्ट केले. आता चेंडू बीसीसीआयच्या कोर्टात असून शेजारी राष्ट्र याबाबत निर्णय घेईल, असे शहरयार यांनी म्हटले होते.
२०१२ मध्ये पाकिस्तानने भारत दौऱ्यात वन-डे मालिका खेळली होती, पण त्यानंतर आशियातील या दोन दिग्गज संघांदरम्यान मालिका खेळल्या गेली नाही. अष्टपैलू शाहिद आफ्रिदी, माजी खेळाडू जावेद मियांदादसह अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी मालिकेसाठी भारताची मनधरणी करण्याच्या पीसीबीच्या भूमिकेवर टीका केली आहे.
-----------
भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान नेहमी तणावपूर्ण संबंध राहिलेले आहे, पण आम्ही क्रिकेट खेळलो आहे. २००७ नंतर भारताने आमच्याविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. आता आम्ही भारताकडे द्विपक्षीय क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी गळ घालणार नाही. यासाठी त्यांना सकारात्मक भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी पुढाकार घ्यावा.
- शहरयार, पीसीबीचे प्रमुख