‘पीसीबीचा बीसीसीआयला ४८ तासांचा अल्टिमेटम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2015 11:26 PM2015-12-13T23:26:41+5:302015-12-13T23:26:41+5:30
भारतासोबतच्या संभाव्य द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी जाहीर केले.
कराची : भारतासोबतच्या संभाव्य द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी जाहीर केले.
शहरयार म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आम्हाला शनिवारी सायंकाळपर्यंत कुठलेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मालिकेबाबतच्या सर्व आशा संपुष्टात आल्या सारख्या आहेत. तरीही आम्ही बीसीसीआयला पत्र लिहून ४८ तासांत मालिकेविषयी निश्चित निर्णय द्यावा, असे कळविले आहे. याबाबत आम्ही सोमवारी अधिकृत घोषणा करणार आहोत.’
पीसीबी अध्यक्ष म्हणाले, ‘मालिकेचे आयोजन रद्द होण्यासाठी पाकिस्तानला कुठल्याच प्रकारे जबाबदार धरता येणार नाही. आम्ही हा मुद्दा आयसीसीपुढे मांडण्याचा विचार करीत आहोत.’
भारत आणि पाकिस्तानने गेल्या वर्षी एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्या करारानुसार उभय देशांदरम्यान २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा द्विपक्षीय मालिकांचे आयोजन करण्यात येणार होते. भारत सरकारतर्फे अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही.
बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि शहरयार यांनी दुबईमध्ये आयसीसीच्या बैठकीदरम्यान द्विपक्षीय मालिका आयोजिण्यास सहमती दर्शविली होती, पण बीसीसीआयने मालिकेबाबतचा अंतिम निर्णय सरकारवर सोपवला होता.
>> आम्ही भारतीय संघासोबत खेळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आयोजन स्थळ यूएईला वगळून श्रीलंका केले, पण आमचे सर्व प्रयत्न अखेर व्यर्थच ठरले. त्यामुळे जगातील लक्षावधी चाहत्यांचा हिरमोड झाला. गेल्यावर्षी आम्ही मालिकेबाबत बीसीसीआयसोबत करार केला होता. आम्ही आमच्यातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले.
- शहरयार खान