पेले ३८ वर्षांनंतर येणार भारतात
By admin | Published: September 8, 2015 04:39 AM2015-09-08T04:39:34+5:302015-09-08T04:39:34+5:30
ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले ३८ वर्षांनंतर भारतात येणार आहेत. अॅटलेटिको डी कोलकाता या संघाच्या उद्घाटनाच्या सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.
कोलकाता : ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले ३८ वर्षांनंतर भारतात येणार आहेत. अॅटलेटिको डी कोलकाता या संघाच्या उद्घाटनाच्या सामन्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत.
येत्या ११ ते १७ आॅक्टोबरदरम्यान पेले भारताचा दौरा करतील. या कालावधीत ते कोलकाता आणि दिल्ली येथे भेट देतील. कोलकाता दौऱ्यात ते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीची भेट घेणार आहेत. एका विद्यापीठात पेले विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. यानंतर त्यांच्या सन्मानार्थ आयोजिण्यात आलेल्या मेजवानीत ते सहभागी होतील.
किंग आॅफ फुटबॉल म्हणून प्रसिद्ध असलेले पेले १९९७ मध्ये यापूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. उद्घाटनाच्या सामन्यात पेलेंना गेस्ट आॅफ आॅनर देण्यात येईल. कोलकाता येथे त्यांच्या दौऱ्यात जमा झालेली रक्कम पश्चिम बंगाल मुख्यमंत्री निधीत जाणार आहे.
दिल्ली दौऱ्यात पेले सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्याला हजेरी लावणार आहेत. भारत दौऱ्याबद्दल बोलताना पेले म्हणाले, ‘‘पुन्हा भारत दौऱ्यावर जाणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी मी तेथे गेलो होतो. त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. भारतीयांचे फुटबॉलप्रेम वाखाणण्यासारखे आहे.’’
(वृत्तसंस्था)