पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणा-या महेंद्रसिंह धोनीला दंड
By admin | Published: May 20, 2015 01:24 PM2015-05-20T13:24:31+5:302015-05-20T15:12:19+5:30
चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ड्वॅन स्मिथला बाद देण्याच्या पंचाच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त करणे धोनीला चांगलेच भोवले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - चेन्नई सुपरकिंग्जचा सलामीवीर ड्वॅन स्मिथला बाद देण्याच्या पंचाच्या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त करणे धोनीला चांगलेच भोवले आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी धोनीला मॅच फीच्या १० टक्के दंड आकारण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा सलामीवीर ड्वॅन स्मिथला पहिल्याच षटकात लासिथ मलिंगाच्या चेंडूवर पायचीत बाद देण्यात आले होते. प्रत्यक्षात चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याने तो बाद नव्हता हे रिप्लेमधून समोर आले होते. मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागल्यावर महेंद्रसिंह धोनीला पंचांचा चुकीचा निर्णय चांगलाच जिव्हारी लागला. सामन्यानंतरच्या मुलाखतीमध्ये धोनीने स्मिथला बाद देण्याचा निर्णय अतिशय चुकीचा होता असे जाहीरपणे सांगितले. मधल्या षटकांमध्ये आमच्या फलंदाजांची लयदेखील बिघडली होती अशी कबुलीही त्याने दिली. पण पंचाच्या निर्णयावर जाहीरपणे नाराजी व्यक्त करणे धोनीला चांगलेच महागात पडले आहे. आयपीएलमधील टीम व्यवस्थापन व खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेतील २.१ मधील परिच्छेदानुसार धोनीने लेव्हल १ मधील नियमांचे उल्लंघन केल्याचे आयपीएल प्रशासनाने म्हटले आहे. धोनीनेही त्याची चूक मान्य केल्याचे समजते.