कामगिरीचे विश्लेषण करता आले- हॉकीपटू सविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 02:38 AM2020-08-20T02:38:22+5:302020-08-20T02:38:31+5:30
मैदानात आणि मैदानाबाहेरील जीवनाबाबतही चांगल्याप्रकारे विचार करता आला,’ असे भारतीय हॉकी संघाची गोलक्षक सविता हिने सांगितले.
बंगळुरू : ‘कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मिळालेल्या विश्रांतीदरम्यान स्वत:च्या कामगिरीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे मैदानात आणि मैदानाबाहेरील जीवनाबाबतही चांगल्याप्रकारे विचार करता आला,’ असे भारतीय हॉकी संघाची गोलक्षक सविता हिने सांगितले.
भारताच्या वरिष्ठ पुरुष व महिला हॉकीपटूंना १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्याची परवानगी मिळाली. हे शिबिर भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साइ) दक्षिण केंद्रात ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
सविताने म्हटले की, ‘माझ्या कारकिर्दीत केवळ याच कालावधीत मी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींसह माझ्या कामगिरीत सुधारणा करण्याबाबत विचार केला. व्यावसायिक खेळाडू म्हणून वेळापत्रक व्यस्त होते. स्वत:साठी विचार करण्याची संधीही मिळत नाही. मात्र गेल्या काही महिन्यांत आणि खासकरून या १४ दिवसांमध्ये मी स्वत:च्या कामगिरीचे विश्लेषण करू शकली.’
>मनप्रीतसह सहा खेळाडू क्वारंटाईन
पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगसह कोरोनामुक्त झालेल्या सहा खेळाडूंचा अपवाद वगळता सर्व पुरुष आणि महिला खेळाडूंनी बुधवारी साधारण सराव केला. मनप्रीतसह सुरेंदर कुमार, जसकरण सिंग, वरुण कुमार, कृष्ण बी. पाठक आणि मनदीप सिंग यांना सोमवारी रुग्णालयातून सुटी मिळाली. सध्या ते क्वारंटाईनमध्ये आहेत.