रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी समाधानकारक : दत्तू भोकनळ

By admin | Published: September 17, 2016 07:41 PM2016-09-17T19:41:39+5:302016-09-17T19:41:39+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये रोइंग या खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पहिला भारतीय म्हणून इतिहास रचणारा महाराष्ट्राचा जिगरबाज खेळाडू दत्तू भोकनळ याने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले

Performance in Rio Olympics is satisfactory: Dattu Bhokanal | रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी समाधानकारक : दत्तू भोकनळ

रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी समाधानकारक : दत्तू भोकनळ

Next
>जयंत कुलकर्णी/ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद,दि.17- रिओ ऑलिम्पिकमध्ये रोइंग या खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पहिला भारतीय म्हणून इतिहास रचणारा महाराष्ट्राचा जिगरबाज खेळाडू दत्तू भोकनळ याने आपल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. आर्मीमध्ये नायब सुभेदार असणाºया दत्तू भोकनळ याचे आता स्वप्न आहे ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकण्याचे.
 
औरंगाबाद येथे अ‍ॅडव्होकेटस् स्पोर्टस् अँड कल्चरल असोसिएशन व सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम क्रीडा महोत्सवासाठी दत्तू भोकनळ शुक्रवारी औरंगाबादेत आला होता. कमी कालावधीत अनेक संकटांवर यशस्वीपणे मात करीत पुढे मार्गक्रमण करणाºया या जिगरबाज खेळाडूने ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला. दत्तू भोकनळ याने जबरदस्त कामगिरी करताना रिओ आॅलिम्पिकमध्ये रोइंगमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठून इतिहास रचला होता; परंतु उपांत्यपूर्व फेरीत चांगल्या सुरुवातीनंतरही दत्तूला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्याने तो पदकापासून वंचित राहिला होता. पदकांपासून वंचित राहावे लागले असले तरी त्याने त्याच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले. दत्तू भोकनळ म्हणाला, ‘पदक जिंकता आले नसले तरी मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे. पदकविजेती कामगिरी करण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे सातत्यपूर्वक सराव करणे आवश्यक असते, परंतु रिओ आॅलिम्पिकसाठी जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीतच सराव करता आला. पदक जिंकण्यासाठी हा सराव पुरेसा नव्हता; परंतु आता आपले टार्गेट हे २0२0 चे टोकियो आॅलिम्पिक असून तेथे देशासाठी पदक जिंकण्याचे आपले स्वप्न आहे.’
 
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथील दत्तू भोकनळ याची आर्थिक परिस्थिती तशी खूपच प्रतिकूल आहे. तथापि, जिद्दीच्या बळावर तो यशाचे शिखर पादाक्रांत करीत आहे. आपल्या रोइंग खेळाविषयीच्या सुरुवातीविषयी तो म्हणाला, ‘२0१२ मध्ये मी खडकी येथे आर्मी जॉईन केली आणि २0१३ मध्ये प्रत्यक्ष रोइंग हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. त्याआधी रोइंग या खेळाची बाराखडीही आपल्याला माहीत नव्हती. आर्मीत गेल्यानंतरच रोइंग शिकलो. त्यानंतर २0१४ या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुणे येथील खुल्या दोन राष्ट्रीय रोइंग स्पर्धांत सिंगल स्कलमध्ये सुवर्णपदके जिंकली. याच वर्षी कोरियातील स्पर्धेत डबल स्कलमध्ये पाचव्या स्थानी राहिलो.’ गतवर्षी दत्तूने प्रभावी कामगिरी केली. बीजिंग येथे २0१५ मध्ये त्याने आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्य आणि २0१६ मध्ये कोरिया येथे झालेल्या आॅलिम्पिक पात्रता फेरीत सुवर्णपदक जिंकले होते. यंदा त्याने सिनसिनाटी येथे अमेरिकन नेशन चॅम्पियनशिप स्पर्धेतही गोल्डन कामगिरी केली. सध्या दत्तू जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी आहे.
 
रोइंग या खेळाचा भारतात कमी प्रसार असल्याची खंत त्याने व्यक्त केली. परदेशाच्या तुलनेत भारतात समुद्रे जास्त नाहीत. पूर्ण देशभरात फक्त ५ ते ६ क्लब आहेत. त्यामुळे या खेळाचा प्रसार होऊ शकलेला नाही. तसेच हा खेळ खूपच खडतर आणि क्षमतेची परीक्षा घेणारा असा आहे. या खेळात शरीरालादेखील इजा होऊ शकते. त्यामुळे या खेळाकडे वळणाºयांची संख्या फारच कमी आहे. रोइंग हा खेळ खोलवर रुजण्यासाठी खेळाडूंना सुविधा, आहार, प्रशिक्षण व सरावासाठी पुरेशी जागा आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने लक्ष पुरवायला हवे, असे दत्तूने सांगितले.
 
प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारा जिगरबाज योद्धा
रोइंग खेळात ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा पहिला खेळाडू म्हणून इतिहास रचणारा दत्तू भोकनळ हा ख-या अर्थाने एक जिगरबाज योद्धाच आहे. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे दत्तूला नववीपासूनच शिक्षण सोडावे लागले.
घरची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर पेट्रोल पंपावर काम करून दत्तूने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यातच २0११ साली त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आणखी जबाबदारी वाढलेला दत्तू २0१२ मध्ये आर्मीमध्ये नोकरीत लागला. तरीदेखील संकटाने त्याची पाठ सोडली नाही. 
गतवर्षी आईला अपघात झाला आणि तब्बल सहा महिने त्या कोमात होत्या. आता तर त्या त्यांच्या मुलांना ओळखतदेखील नाहीत. दु:खाचा डोंगर, कुटुंबाची जबाबदारी आणि आईचा आजार या पातळीवर लढतानाच जिद्दी दत्तूने रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचताना उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला, असे त्याचे काका शिवाजी पाटील भोकनळ यांनी सांगितले.
 

Web Title: Performance in Rio Olympics is satisfactory: Dattu Bhokanal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.