ही कामगिरी आॅस्ट्रेलियात महत्त्वपूर्ण ठरेल
By Admin | Published: November 4, 2014 01:40 AM2014-11-04T01:40:41+5:302014-11-04T01:40:41+5:30
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे
कटक : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्या शानदार कामगिरीवर जाम खुश झाला आहे.
या लढतीत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३६३ असा धावांचा डोंगर रचला. त्यानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या इशांतने श्रीलंकन फलंदाजांना खूपच अडचणीत आणले.
पॉवरप्ले पहिले घेतल्याच्या निर्णयाविषयी कोहलीने हे आपले पाऊल लाभदायक ठरल्याचे म्हटले. तो म्हणाला, युवा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यासाठी आवडीचे आहे आणि विश्वचषक उंबरठ्यावर असल्यामुळे मी रोमांचित होतो. दोन्ही फलंदाजांनी आपला चांगला जम बसवला होता आणि त्यामुळे मी डंकन फ्लेचर यांच्याशी पॉवर प्ले लवकर घेण्याविषयी चर्चा केली होती.
वेगवान गोलंदाज वरुण अॅरोन दुखापतग्रस्त झाल्यामुळे आपण जास्त जोखीम घेऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर पाठवल्याचेही कोहली म्हणाला. तो म्हणाला, अॅरोनला चौथ्या षटकानंतर त्रास होत होता आणि त्याची जखम इतकी गंभीर नसल्याचे मला माहीत होते. मी कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नव्हतो. त्यामुळे मी त्याला विश्रांती करण्यास सांगितले. (वृत्तसंस्था)