पाक संघाला भारतात जाण्यास परवानगी
By admin | Published: February 26, 2016 04:00 AM2016-02-26T04:00:13+5:302016-02-26T04:00:13+5:30
पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाक सरकारने आपल्या संघाला परवानगी दिली आहे. परंतु या संघाच्या सुरक्षेची
कराची : पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२0 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाक सरकारने आपल्या संघाला परवानगी दिली आहे. परंतु या संघाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे पाक संघ वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार की नाही, या दीर्घकाळ चाललेल्या चर्चेवर आता पडदा पडला आहे. भारताबरोबरची त्यांची लढत १९ मार्चला धर्मशाला येथे होणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) शहरयार खान यांनी एका प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की आमच्या संघाला सरकारने भारतात खेळण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आनंदी आहे. आमच्या संघाच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात यावी, अशी विनंती आम्ही आयसीसीला केली आहे. या स्पर्धेसाठी अनेक चाहते भारतात जाऊ इच्छितात, त्यांना विजा आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या वर्ल्डकपसाठी सरकारकडून परवानगी मिळाली, तरच पाक संघ भारतात जाईल, असे यापूर्वी पीसीबीने स्पष्ट केले होते. पण, त्याचबरोबर या स्पर्धेत न खेळल्यास मोठा दंड होऊ शकतो, असेही शहरयार यांनी म्हटले होते.