महिला क्रिकेटपटूंना लीगसाठी परवानगी
By admin | Published: June 3, 2016 02:24 AM2016-06-03T02:24:59+5:302016-06-03T02:24:59+5:30
भारतीय महिला क्रिकेटपटूंना विदेशात लीग खेळण्यास बीसीसीआयने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेटपटूंना विदेशात लीग खेळण्यास बीसीसीआयने परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिताली राज, झुलन गोस्वामीसारख्या खेळाडूंचा ‘बिग बॅश’सारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.
बीसीसीआयने याआधी महिला क्रिकेटपटूंना केंद्रीय करारात सहभागी केले आहे. ईएसपीएन क्रिक इन्फोनुसार भारतीय महिला खेळाडू यापुढे इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात लीग खेळू शकतील. त्यांच्या कराराला बीसीसीआयने मान्यता दिल्यानंतर त्यांना विदेशात खेळण्यासाठी जाता येईल. बीसीसीआयच्या महिला क्रिकेट समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत महिला खेळाडूंना आॅस्ट्रेलिया, तसेच इंग्लंडमधील लीग खेळण्यास परवानगी बहाल करण्याचा निर्णय झाला. ३० जुलै ते १४ आॅगस्ट या कालावधीत ‘वूमेन्स सुपर लीग’चे आयोजन होत असून, त्यासाठी खेळाडूंना परवानगी देण्याची मुदत संपली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने सर्वच पूर्णकालीन सदस्य बोर्डांना पत्र पाठविले होते. पण, त्या वेळी बीसीसीआयने यावर चर्चा केली नव्हती. ईसीबीने लीगसाठी आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका आणि वेस्ट इंडीज येथील १८ विदेशी खेळाडूंना करारबद्ध केले आहे. संघांची अंतिम यादी एप्रिल महिन्यातच प्रसिद्ध करण्यात आली. (वृत्तसंस्था)
‘कोचपदासाठी हिंदी अनिवार्य नाही’
नवी दिल्ली : टीम इंडियाच्या मुख्य कोचपदासाठी हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक तर आहे; पण अनिवार्य नाही. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या जाहिरातीनंतर आज गुरुवारी हे स्पष्टीकरण दिले. मुख्य कोच पदासाठी १० जूनपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. त्यासाठी कालच वेबसाइटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यात नऊ अटी आहेत. त्यातील सहाव्या अटीबद्दल बोर्डाला आज स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. कोचपदाच्या दावेदारासाठी इंग्रजीचे ज्ञान अनिवार्य आहे. हिंदी बोलता येणे आवश्यक तर आहे; पण अनिवार्य नाही, असे बोर्डाचे सचिव अजय शिर्के यांनी स्पष्ट केले.