फिलिप ह्यूजचे निधन ही केवळ दुर्दैवी घटना!
By admin | Published: November 5, 2016 05:38 AM2016-11-05T05:38:18+5:302016-11-05T05:38:18+5:30
डोक्यावर बाऊन्सर आदळताच आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा २५ नोव्हेंबर २०१४ ला मृत्यू झाला.
सिडनी : डोक्यावर बाऊन्सर आदळताच आॅस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्यूज याचा २५ नोव्हेंबर २०१४ ला मृत्यू झाला. या घटनेमुळे जगभरात खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. मीडियात चर्चा रंगल्या. न्यू साऊथवेल्सच्या कोरोनर्स न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालात ही केवळ दुर्दैवी घटना होती, असे संबोधले आहे.
प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने मत नोंदविले की, आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजासोबत घडलेल्या दुर्दैवी प्रकाराची घटना सुरक्षा उपायातील चूक किंवा खेळाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे झालेली नाही. मैदानावर घडलेला तो दुर्दैवी प्रकार होता. सिडनी क्रिकेट मैदानावर स्थानिक सामन्यात साऊथ आॅस्ट्रेलियाच्या ह्यूजच्या मानेच्या मागच्या भागावर बाऊन्सर आदळला होता. दोन दिवसांनंतर इस्पितळात त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेची समीक्षा आणि घटना टाळता आली असती काय, याची शहानिशा करणारे अधिकारी मायकेल बार्नेस म्हणाले, ‘ह्यूज असुरक्षित माहोलमध्ये खेळत असल्याचे मला कुठलेही पुरावे आढळले नाहीत. ह्यूजच्या कुटुंबाने हा आरोप केला होता. त्यांच्या कुटुंबातील युवा सदस्य गेल्याचे दु:ख त्यांना असेल; पण माझ्या चौकशीत असे काहीही आढळले नाही. खेळाच्या सर्व नियमांचे पालन झाले होते, हे सत्य ह्यूजच्या कुटुंबाने स्वीकारावे, असे माझे मत आहे.’
आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने ह्यूजच्या निधनापासून धडा घेत मे महिन्यात सर्वच फलंदाजांना हेल्मेट घालणे अनिवार्य केले होते. ह्यूजला खेळतेवेळी अनेक आखूड टप्प्याच्या चेंडूंना तोंड द्यावे लागले; पण हे सर्व खेळाच्या नियमानुसारच होते, असेही बार्नेस यांनी नमूद केले. न्यायालयाच्या मते, ह्यूजला खेळादरम्यान स्लेजिंगचा सामना करावा लागला होता काय, याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही, पण क्रिकेटसारख्या सुंदर खेळाला स्लेजिंगची गरजच नाही.’ (वृत्तसंस्था)
>ह्यूजच्या निधनानंतर त्याच्या हेल्मेटवरूनही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते; पण बार्नेस यांच्या मते, हेल्मेट असताना ह्यूजसोबत घडलेला तो प्रकार टाळणे कठीण होते.