‘फुल’राणीकडूनही निराशा, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2016 05:32 AM2016-08-15T05:32:24+5:302016-08-15T05:32:24+5:30

किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत भारतीयांना काही अंशी दिलासा दिला

Phoolaani's disappointment, Srikanth in the pre-quarterfinal round | ‘फुल’राणीकडूनही निराशा, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत

‘फुल’राणीकडूनही निराशा, श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत

Next

शिवाजी गोरे
थेट रिओ येथून...
रिओ : पदकाचे आशास्थान असलेली सायना नेहवालला रिओ आॅलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत रविवारी धक्कादायक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर किदाम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत भारतीयांना काही अंशी दिलासा दिला. सायनाच्या पराभवामुळे निराशा झालेल्या भारतीय तंबूत श्रीकांतच्या विजयामुळे उत्साह संचारला. श्रीकांतने स्वीडनच्या हेन्री हसॅकॅनेनला ३३ मिनिटांमध्ये २१-६, २१-१८ने हरवून उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.
लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणारी भारताची ‘फुल’राणी सायना नेहवाल रविवारी युक्रेनची खेळाडू मारिया युलिटिनाकडून १८-२१, १९-२१ने पराभूत झाली. बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या या लढतीतील पराभवासह सायनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेली सायनाचा या लढतीतील खेळ लौकिकास साजेसा अजिबातही नव्हता. याचा पुरेपूर फायदा उचलत मारियाने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सायनाचा दबदबा पाहता जागतिक क्रमवारीत ६१व्या क्रमांकावर असलेल्या मारियासाठी ही लढत सोपी नव्हती. मात्र, लयीत नसलेल्या साईनाने सामन्यात भरपूर चुका केल्या. यामुळे, अनेकदा कोर्टच्या चारही बाजूस पळताना शटलपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरूनही मारियाने बाजी मारली. सायनाच्या चुकांमुळे चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यातील दोन्ही गेममध्ये निर्णायक क्षणी युक्रेनच्या खेळाडूने गुण वसूल करीत अंतिम १६ खेळाडूंत स्थान मिळवले.
>सायना : दुखापतीमुळे अपयश
रिओ : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत साखळी फेरीत पराभव स्वीकारणारी जागतिक क्रमवारीत माजी नंबर एक खेळाडू सायना नेहवालने गुडघ्यावर सूज आल्यामुळे पराभव स्वीकारावा लागल्याची प्रतिक्रिया दिली.
माझ्या गुडघ्यावर सूज असल्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही. मी पट्टी बांधून खेळताना सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मला कोर्टवर हालचाल करताना अडचण भासत होती. पराभव निराशाजनक आहे. ही दुखापत दीड आठवड्यापूर्वी आॅलिम्पिक स्पर्धेसाठी सरावादरम्यान झाली होती. सामन्यादरम्यान ही दुखापत उफाळली.
स्पर्धा सुरू होऊन ८ दिवस झाले असले तरी, भारताची पदकांची पाटी अद्याप कोरीच आहे. अशा स्थितीत तमाम भारतीयांना सायनाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ‘ग’ गटातील आपल्या अखेरच्या लढतीत तिने अपेक्षाभंग केला. सायनाने सुरुवात चांगली केली. प्रारंभी तिने ७-३ आणि पुढे १०-८ अशी आघाडी घेतली होती. मात्र, मारियाने चिवट प्रतिकार करीत ११-११ने बरोबरी साधली. दोन्ही खेळाडू प्रयत्नांची शर्थ करीत असल्याने स्कोर १७-१७ असा होता. या क्षणी मारियाने आपला खेळ उंचावत सलग ३ गुण वसूल केले आणि आघाडी २०-१७वर नेऊन ठेवली. अशा स्थितीत सायना आपल्या फटक्यांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरली. तिचा रिटर्न शॉट कोर्टबाहेर पडताच हा गेम २१-१८ अशा फरकाने मारियाच्या नावे झाला.
दुसऱ्या गेममध्येदेखील दोन्ही खेळाडू प्रत्येक गुणासाठी झुंज देत होते. मात्र, त्यात फरक होता. नेहमीसारखा दर्जेदार खेळ होत नसल्याने, तुलनेत कमजोर प्रतिस्पर्धी असूनही सायनावर एकेका गुणासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती. १५ गुणांपर्यंत दोघीही एकमेकींना गाठत होत्या. सलग २ गुण मिळवीत सायनाने आघाडी घेतल्यानंतर मारियाने काही क्षणांतच १७-१७ अशी बरोबरी गाठली. युक्रे नच्या खेळाडूने अप्रतिम स्मॅश लगावत १९-१८ने आघाडी घेतली. सायनाने १९-१९ अशी बरोबरी साधल्यानंतर ही लढत तीन गेमपर्यंत ताणली जाणार, अशी आशा भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली. मात्र, अशा निर्णायक क्षणी अफलातून खेळ करीत मारियाने भारतीयांच्या आशांना सुरूंग लावला.

Web Title: Phoolaani's disappointment, Srikanth in the pre-quarterfinal round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.