Pickleball World Rankings : जाणून घ्या साराहनं शेअर केलेली Pickleball गेम संदर्भातील रंजक गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:12 PM2024-10-28T12:12:18+5:302024-10-28T12:27:11+5:30
भारतात सध्या पिकलबॉल खेळासंदर्भात जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
India Masters Pickleball Championship : भारतात सध्या पिकलबॉल अर्थात रॅकेट किंवा पॅडल स्पोर्ट्स नावाने लोकप्रिय होत असलेल्या खेळाची चर्चा रंगताना दिसत आहे. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आता भारतातही प्रयत्न सुरु झाले आहेत. याच उद्देशानं पीडब्लूआर डीयूपीआर इंडिया मास्टर्स (PWR DUPR India Masters) स्पर्धा दिल्लीत नुकतीच पार पडली. भारतात पहिल्यांदाच रंगलेल्या या स्पर्धेत स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जवळपास ७५० खेळाडूंनी सहभाग घेतल्याचे पाहायला मिळाले. यात ऑस्ट्रेलियाची पिकलबॉल स्टार साराह बर (Sarah Burr) हिचा देखील समावेश होता. तिने जागतिक स्तरावर हा खेळ लोकप्रिय का होत आहे? त्यामागच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम खेळ
पीडब्लूआर डीयूपीआर इंडिया मास्टर्स (PWR DUPR India Masters) स्पर्धेच्या निमित्ताने भारतात आलेली साराह म्हणाली की, पिकबॉल हा खेळ सर्व वयोगटातील मंडळींसाठी आहे. फिट राहण्यासाठी या खेळाला पसंती देणं प्रत्येकाच्या फायद्याचे ठरेल. हा खेळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठरतो, असे तिने म्हटले आहे.
पिकलबॉल हा खेळ टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिसच्या धाटणीतील, पण..
आपल्याकडे टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पिकलबॉल खेळ प्रकारही या खेळाच्या धाटणीतील आहे. खुद्द साराहनं ते मान्य केले आहे. ती म्हणाली की, पिकलबॉलमध्ये हात आणि नजर भिरभिरत ठेवत कमालीचा समोतल साधावा लागतो. हे कौशल्य अगदी टेनिस, बॅडमिंटन किंवा टेबल टेनिसप्रमाणेच आहे. पण काही वेगळ्या आणि मनोरंजक नियमामुळे हा खेळ इतर खेळांपेक्षा वेगळा ठरतो. प्रतिस्पर्धी खेळाडू विरुद्ध रणनिती आखण्यासाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जातात. एवढेच नाही तर शारिरीक कष्टही घ्यावे लागतात. माझ्या कुटुंबियातील सर्वच सदस्य हा खेळ खेळतात. या खेळामुळे आमच्यात उत्तम संवाद अगदी सहज शक्य होतो, असे तिने म्हटले आहे.
नेट बाहेरुन नेटानं फटका मारण्याचा फंडा
या खेळातील आवडता शॉट कोणता? याबद्दलही ती म्हणाली की, Around the Post shot हा आवडता शॉट आहे. या शॉटचे वैशिष्ट्ये असं की, चेंडू नेटवरून गेला नसतानाही खेळाडूनं मारलेला फटका वैध मानला जातो. टेनिस, बॅडमिंटनपेक्षा असणारं वेगळेपण आणि रंजक नियम यात दिसून येतो.