पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!
By admin | Published: February 14, 2015 11:30 PM2015-02-14T23:30:57+5:302015-02-14T23:30:57+5:30
क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाला तिसऱ्यांदा जगज्जेता बनताना पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून आॅस्ट्रेलियाला रवाना झालो.
आशिष जैन
थेट ऑस्ट्रेलियाहून
क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाला तिसऱ्यांदा जगज्जेता बनताना पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगून आॅस्ट्रेलियाला रवाना झालो. मधला मुक्काम मलेशियाची राजधानी क्वालालम्पूरला होता. तेथून पुढे अॅडिलेडला जायचे होते. क्वालालम्पूर विमातळावर बहुचर्चित भारत-पाक सामन्यापूर्वीच्या तापलेल्या वातावरणाचे संकेत मिळाले. उद्या दि.१५ फेब्रुवारी रोजी कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी संघादरम्यान होणाऱ्या महायुद्धाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी उभय संघांचे चाहते फ्लाईटमध्ये दाखल झाले.
विमानातही कुणी गप्प बसणार असेल तर नवलच! भारत-पाक क्रिकेट सामना एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतोच. उभय संघांचे पाठिराखे मागे कसे राहणार! चाहत्यांमध्येही शाब्दिक युद्धाची सुरुवात झाली. एक भारतीय म्हणाला,‘धोनी बाप बनला यार! त्याची कन्या नशिबाची दारे उघडेल. भारतासाठी ती ‘लकी’ सिद्ध होईल.’ सचिनचा फॅन वाटणारा आणि सहकाऱ्याला क्रिकेटचे किस्से ऐकवित बोअर करणारा दुसरा चाहता अचानक राजकारणाचा खेळाशी संबंध जोडून म्हणाला,‘दिल्लीत ‘आप’ फॉर्ममध्ये आली आहे. तुम्ही पाहात राहा, टीम इंडियादेखील फॉर्ममध्ये परतून जेतेपदाचा ‘ताज’ कायम राखेल!’ मी उत्सुकतेने सर्वांच्या गोष्टी ऐकत होतो.
तिकडे पाकच्या टोळक्यातही क्रिकेटच्याच चर्चा रंगल्या होत्या. टीम इंडिया ‘आॅफ फॉर्म’ असल्यामुळे पाकचे हौसले काही अंशी बुलंद झाले होते. त्या सर्वांच्या चर्चा ऐकून मला एका चॅनलवरील जाहिरातीची आठवण झाली. कराचीतील एक क्रिकेटप्रेमी विश्वचषकात भारताविरुद्ध पाकचा विजय व्हावा या हेतूने फटाके घरी आणतो. १९९२ पासून २०११ पर्यंत ते फटाके ठेवल्या-ठेवल्या खराब होऊन जातात, कारण पाकने विश्वचषकात भारताला कधीही हरविलेले नाही.
पाकिस्तानी चाहत्यांच्या चर्चेने माझे मौन तोडले. गप्प राहणे असह्य झाले होते. माझे क्रिकेटप्रेमच नव्हे तर राष्ट्रप्रेमदेखील उफाळून आले. मी सिटवरून उठून थेट पाकच्या त्या पाठीराख्यांच्या टोळक्यात गेलो. सर्वांना माझा संपूर्ण परिचय दिला.
स्वत:पुढे एका भारतीय चाहत्याला पाहून ते सर्वजण एकदम जोशात आले. त्यातील एकजण म्हणाला,‘जैन साहाब, यंदा विजय तर पाकचाच होईल. तुमच्या संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहा. दोहोंमध्ये टीम इंडियाची घसरण झाली आहे. और...’, तो पुढे काही बोलणार तोच मी उत्तरलो,‘जनाब छोडिए, १९९२ ते २०११ यादरम्यान तुमच्या संघाला आम्ही पाचपैकी पाचवेळा धूळ चारली आणि तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की, टीम इंडियाने दोनदा विश्वचषकदेखील जिंकला.’
माझे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले असावे पण राग त्याने पिऊन टाकला. पुन्हा बोलला,‘तुम्ही
टीम इंडियाचा अलिकडच्या दोन-तीन महिन्यातील रेकॉर्ड बघा! तुमचा
संघ एकदाही विजयी होऊ
शकला नाही. अशा संघाला धूळ चारणे पाकसाठी डाव्या हाताचा खेळ आहे.’
गमतीजमतीने सुरू झालेली ही चर्चा थोडी ‘गरम’ होऊ लागली. मग
काय, पुढे बोलणे मला योग्य वाटले नाही. या चर्चेला पूर्णविराम देणे गरजेचे होते. मी म्हणालो,‘तुम्ही बॉलिवूडचे चित्रपट पाहात
असालच. बॉलिवूडचा बादशाह शहारुख खान याचा तो डॉयलॉगही आठवत असेल,‘पिक्चर अभी बाकी
है मेरे दोस्त’! पाकचा तो चाहतादेखील समजला.