Lovlina Borgohain: वर्तमानपत्राचा तुकडा आयुष्याला वळण देऊन गेला!, लवलिनाचे कांस्य देईल प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 05:25 AM2021-08-15T05:25:01+5:302021-08-15T05:25:54+5:30
Lovlina Borgohain : बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय आहे.
एक छोटा प्रसंग अनेकांना अशी काही प्रेरणा देऊन जातो की त्यांच्याकडून पुढे इतिहास रचला जातो. असा एक प्रसंग लवलिना बोरगोहेन हिला प्रेरणा देऊन गेला आणि भारताला ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमधील तिसरे पदक मिळाले.
बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लवलिना ही विजेंदर सिंग आणि मेरी कोम यांच्यानंतरची केवळ तिसरी भारतीय आहे.
दोन जुळ्या बहिणींसोबत राहणाऱ्या लवलिनाच्या घरी खेळाचे वातावरण होतेच. दोन्ही बहिणी
किक बॉक्सिंग उत्तम प्रकारे खेळत असल्याने लवलिनाही या खेळाकडे वळाली. परंतु, एका आनंदाच्या प्रसंगी वडील टिकेन यांनी वृत्तपत्रात गुंडाळून मिठाई आणली. मात्र चिमुकल्या लवलिनाची नजर त्या वृत्तपत्रातील एका खेळाडूच्या फोटोवर पडली. वडिलांकडे विचारपूस केल्यावर त्या खेळाडूचे नाव कळाले, मोहम्मद अली. बस्स.. मग काय अलीच्या पराक्रमाची माहिती मिळाल्यानंतर लवलिनानेही एक लक्ष्य निर्धारित केले ते म्हणजे बॉक्सिंग चॅम्पियन होण्याचे आणि त्यानंतर जे घडले तो इतिहास...
आठ वर्षे सुट्टी घेतली नाही!
लवलिनाने तब्बल आठ वर्षे एकही दिवस सुट्टी न घेता केवळ आपल्या लक्ष्याचा विचार केला. भारतात परतल्यानंतर लवलिनाने म्हटले होते की, ‘अनेक गोष्टींचा त्याग केल्याने आज हे पदक मिळाले आहे.’
२०१२ नंतर पहिल्यांदाच सुट्टी घेत लवलिना पदकाचा आनंद साजरा करत आहे. ती आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहिलीच, शिवाय आवडत्या पदार्थांपासूनही दूर राहिली. आसाम सरकारने लवलिनाच्या गोलाघाट गावात पक्का रस्ता बांधून दिला आहे.
लवलिनाची कामगिरी!
आशियाई अजिंक्यपद : कांस्य
(२०१७ व २०२१).
जागतिक अजिंक्यपद : कांस्य
(२०१८ आणि २०१९).
टोकियो ऑलिम्पिक : कांस्य
(२०२१)