खेळपट्टी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल
By Admin | Published: March 16, 2017 01:23 AM2017-03-16T01:23:12+5:302017-03-16T01:23:12+5:30
भारत - आॅस्टे्रलिया दरम्यान रांची येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष २२ यार्डच्या खेळपट्टीकडे लागले आहे.
- अयाझ मेमन , संपादकीय सल्लागार
भारत - आॅस्टे्रलिया दरम्यान रांची येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष २२ यार्डच्या खेळपट्टीकडे लागले आहे. रांचीची खेळपट्टीदेखील पुणे व बंगळुरूप्रमाणे गोलंदाजांना जास्त फायदेशीर राहणार का, ही खेळपट्टी पहिल्याच दिवसापासून फिरकी
घेणार का, असे प्रश्न सर्वांना पडत असले, तरी याचे उत्तर मात्र कोणाकडेही नाही. खेळपट्टीकडे पाहून तरी असेच वाटते की, ही पाटा
विकेट नक्कीच नसणार आणि
अशी खेळपट्टी नसायलाच हवी. कारण, भारतात पाटा विकेट असेल, तर जिंकण्याची शक्यता फार कमी असते. त्याचबरोबर ही खेळपट्टी वेगवान नसेल. यावर गवताचे प्रमाण कमी आहे. शिवाय, वेगवान खेळपट्टी बनवून आॅस्टे्रलियाला मदत का करावी?
माझ्या मते ही खेळपट्टी पुणे आणि बंगळुरूप्रमाणे फिरकी गोलंदाजांनाच मदतशीर ठरेल. मात्र, मला वाटते की खेळपट्टीला इतकेही महत्त्व देऊ नये की, खेळाडूंची कामगिरी खेळपट्टीवर अवलंबून राहील. त्याचबरोबर नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरू शकतो. सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे पुणे आणि बंगळुरू येथे नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने सामनाही जिंकला. मात्र, तरीही नाणेफेकीवर ५०-५० संधी आहे. त्यामुळे नाणेफेक कोणीही जिंकू दे, चांगल्या कामगिरीचा प्रयत्न भारतीय संघाचा असला पाहिजे. बंगळुरूमध्ये भारतीय फलंदाजांनी व गोलंदाजांनी दाखवून दिले की, पहिल्या डावात पिछाडीवर असल्यानंतरही जिंकता येते. त्यामुळे सामना जिंकायचा असेल, तर भारतीयांना त्याच आत्मविश्वासाने खेळावे लागेल.
संघ रचनेबाबत बोलायचे झाल्यास माझ्यामते भारतीय संघात खास बदल करण्याची आवश्यकता नाही. मुरली विजय खांदा दुखापतीतून सावरला असेल, तर तो आपली जागा पुन्हा घेईल. कारण, तो सातत्यपूर्ण सलामीवीर राहिला असून, त्याच्या जागी खेळलेल्या अभिनव मुकुंदने फार काही करून दाखवले नाही. त्याव्यतिरिक्त मला काही बदल दिसत नाही. तसेच, तीन फिरकीपटू खेळवण्याचीही काहीच गरज दिसत नाही. कारण, रविचंद्रन आश्विन आणि रवींद्र जडेजा संघासाठी चांगली कामगिरी करीत आहेत. त्याचबरोबर
उमेश यादव - इशांत शर्मा ही वेगवान जोडी कायम राहील. फिरकी खेळपट्टीवरही या जोडीने चांगला मारा केला आहे.
दुसरीकडे, आॅस्टे्रलियासाठी अनेक अडचणी आहेत. मिचेल मार्श, मिचेल स्टार्क हे दोन्ही आघाडी खेळाडू जखमी आहेत. खास करून
स्टार्कची अनुपस्थिती आॅस्टे्रलियाला प्रकर्षाने जाणवेल. त्याने मालिकेत जास्त बळी घेतले नसले, तरी जबरदस्त मारा करीत त्याने धावाही काढल्या आहेत. त्याच्या जागी पॅट कमिन्सला संधी मिळू शकते. तसेच, मार्शच्या जागी धडाकेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल की मार्कस स्टॉइनीसला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
स्टॉइनीस मध्यमगती गोलंदाज असून चांगली फलंदाजी करतो, तर मॅक्सवेल धुवाधार फलंदाजीसह उपयुक्त फिरकी माराही करतो. त्यामुळे आॅसीसाठी खूप विचार करावा लागणार आहे; पण डेव्हिड स्मिथ, स्टीव्ह स्मिथ, नॅथन लिआॅन,
जोश हेजलवूड आणि स्टिव्ह ओकीफी या खेळाडूंनी आॅस्टे्रलियाच्या विजयाच्या संधी निर्माण केल्या
असून, यांच्यावर कांगारूंची अधिक मदार असेल.