पंजाबला पीयूष ‘चावला’
By Admin | Published: May 9, 2015 11:57 PM2015-05-09T23:57:45+5:302015-05-09T23:57:45+5:30
अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने सुनील नरेनचा अचूक मारा, आंद्रे रसेल व पीयूष चावलाची आक्रमक फलंदाजी
कोलकाता : अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने सुनील नरेनचा अचूक मारा, आंद्रे रसेल व पीयूष चावलाची आक्रमक फलंदाजी यांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा एक गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या आठव्या पर्वात विजयाच्या हॅट््ट्रिकसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली.
पंजाब संघाने दिलेल्या १८४ धावांचे लक्ष्य केकेआर संघाने १ चेंडू व १ गडी राखून पूर्ण केले. केकेआर संघाच्या विजयात कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेन (४-१९), आंद्रे रसेल (५१ धावा, २१ चेंडू, ५ चौकार, ४ षटकार), युसूफ पठाण (२९ धावा, १९ चेंडू, १ चौकार, ३ षटकार) व पीयूष चावला (१८ धावा, ११ चेंडू, २ चौकार, १ षटकार) यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली.
या लढतीतील अखेरचे षटक नाट्यमय ठरले. त्यात निकालाचे पारडे दोलायमान असल्याचे दिसून आले. या षटकात यजमान संघाला विजयासाठी ७ धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर ब्रॅड हॉग धावबाद झाला. त्यानंतर पीयूष चावलाने षटकार ठोकून संघाला लक्ष्याच्या समीप नेले; पण पुढच्याच चेंडूवर तो रिद्धिमान साहाकडे झेल देऊन माघारी परतला. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या सुनील नरेनने लेगबायची एक धाव घेऊन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयानंतर गत चॅम्पियन केकेआर संघाने १२ सामन्यांत १५ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. ११ सामन्यांत १४ गुणांची कमाई करणारा चेन्नई संघ दुसऱ्या स्थानी आहे. ११ सामन्यांत नववा पराभव स्वीकारणारा पंजाब संघाच्या खात्यावर ४ गुणांची नोंद आहे. पंजाब संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेला आहे. यंदाच्या मोसमात ईडन गार्डन्सवर अखेरचा सामना खेळणाऱ्या केकेआर संघाने विजयाची हॅट््ट्रिक नोंदवून स्थानिक चाहत्यांचा निरोप घेतला.
त्याआधी, ग्लेन मॅक्सवेलची २२ चेंडूंतील ४३ धावांची खेळी व आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ५ बाद १८३ धावांची दमदार मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पंजाब संघाला मुरली विजय व मनन व्होरा यांनी सलामीला ३४ चेंडूंत ४५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. फिरकीपटू सुनील नरेनने विजयला (२४ धावा, २२ चेंडू) बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. बीसीसीआयकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या नरेनने ४ षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने १७व्या षटकात मॅक्सवेल व रिद्धिमान साहा यांना बाद करून पंजाब संघाला २०० धावांचा पल्ला गाठण्यापासून रोखले. मनन व्होरा (३९ धावा, ३४ चेंडू, १ चौकार, ३ षटकार) नरेनचा दुसरा बळी ठरला. या स्पर्धेत प्रथमच सूर गवसल्याचे संकेत देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला नरेनने बाद करून पंजाब संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. मॅक्सवेलने २२ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली . नरेनने त्यानंतर रिद्धिमान साहा (३३ धावा, २५ चेंडू, २ षटकार) याला बाद केले. मिलरने अखेरच्या षटकात रसेलला २ चौकार व २ षटकार मारून पंजाबला १८३ धावांची मजल मारून दिली. मिलरने ११ चेंडूंत नाबाद २७ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)