यू मुंबाचा कर्णधार म्हणतो, 'कधी कधी हरलंही पाहिजे!'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:37 PM2024-01-04T21:37:40+5:302024-01-04T21:37:54+5:30
मुंबई : यू मुंबा तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क - मुंबई : यू मुंबा तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. शुक्रवारपासून पटना पायटेट्स विरुद्ध दबंग दिल्ली या सामन्याने प्रो कबड्डी लीगच्या दहाव्या सत्रात मुंबईतील सामन्यांना सुरुवात होईल. या सामन्यानंतर यजमान यू मुंबा बंगळुरु बुल्सला भिडेल. यू मुंबाने सलग चार सामने जिंकत मुंबईत प्रवेश केल्याने चाहत्यांना संघाने हीच कामगिरी कायम राखण्याची इच्छा आहे. मात्र, यू मुंबाचा कर्णधार सुरिंदर सिंगने, 'कधी कधी पराभव होणेही चांगले ठरते,' असे म्हणत सर्वांना गोंधळून टाकले.
घरच्या मैदानावर यंदाच्या सत्रातील पहिला सामना खेळण्याआधी यू मुंबाचा कर्णधार सुरिंदर याने 'लोकमत'शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ' खेळामध्ये हार-जीत होत असते आणि कधी कधी पराभवही झाला पाहिजे, कारण दमदार पुनरागमनासाठी हा पराभव महत्त्वाचा ठरतो. पराभवानंतर आपण आपल्या चुकांकडे जास्त लक्ष देतो. जिंकल्यानंतर आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करतो. पराभवातूनच प्रत्येक व्यक्ती यशस्वी कामगिरी करत असते, त्यामुळे पराभवही झाला पाहिजे. आपल्या चुकांचे विश्लेषण करुन त्यात सुधारणा करुन पुनरागमन करण्याचा प्रयत्न करायचा असतो. सामन्यात प्रत्येक खेळाडू सराव करुन उतरलेला असतो आणि पराभवासाठी एक क्षण कारणीभूत ठरतो. त्या क्षणी आपण कुठे चुकलो, कोणती चाल चुकीची केली किंवा समोरच्या संघाने कोणती रणनिती चांगली आखली, याचे विश्लेषण करता आले पाहिजे.'
घरच्या मैदानावर मोठ्या कालावधीनंतर खेळणार असल्याने यासाठी उत्सुक असल्याचेही सुरिंदर म्हणाला. त्याने म्हटले की, 'चार वर्षांनी घरच्या मैदानावर खेळणार असल्याने कोणतेही दडपण नाही. संघात उत्साहाचे वातावरण असून सर्वांनाच घरच्या मैदानावर खेळण्याची उत्सुकता लागली आहे. आम्ही विजयी मालिका कायम राखण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. आम्ही आमच्या योजनेत कोणताही बदल करणार नाही. स्पर्धेत आगेकूच करताना आम्ही एकावेळी एका सामन्यावर लक्ष देऊन तयारी करत आहोत. घरच्या चाहत्यांचा मिळणारा पाठिंबा मोलाचा ठरणार असून या जोरावर आम्ही आगेकूच करु.'