PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
By ओमकार संकपाळ | Published: October 1, 2024 03:04 PM2024-10-01T15:04:19+5:302024-10-01T15:04:45+5:30
pkl u mumba captain 2024 : यू मुंबा सुनील कुमारच्या नेतृत्वात खेळेल.
ओमकार संकपाळ
u mumba captain sunil kumar : प्रो कबड्डी लीगच्या इतिहासातील सर्वात ग्लॅमरस संघ असलेल्या यू मुंबाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सुनील कुमारवर सोपवण्यात आली आहे. नवीन हंगामात नवीन कर्णधाराच्या नेतृत्वात असलेल्या यू मुंबासमोर खूप आव्हाने आहेत. मात्र, ही आव्हाने मोडून ट्रॉफीपर्यंतच्या प्रवासासाठी आपण सज्ज असल्याचे सुनील कुमारने 'लोकमत'शी बोलताना सांगितले. यू मुंबाचा कर्णधार झालो याचा खूप आनंद असून, या संघाने आणि व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास यावर खरा उतरण्यासाठी मेहनत घेत असल्याचे सुनील कुमारने नमूद केले.
"आता माझ्यासमोर काही आव्हाने आणि मोठी जबाबदारी आहे. दुसऱ्या हंगाामाचा किताब पटकावल्यानंतर आणि तिसऱ्या हंगामात अंतिम फेरी गाठल्यानंतर यू मुंबाला पुन्हा म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. पण, आगामी अकराव्या हंगामात खूप मेहनत करू आणि यू मुंबाला दुसऱ्यांदा चॅम्पियन करण्याच्या इराद्याने खेळू. प्रो कबड्डी लीगमधील सर्व १२ संघ तगडे आहेत. जो संघ पहिल्या पाच-सहा सामन्यांमध्ये शानदार कामगिरी करेल त्यांचा मार्ग सुखकर असेल यात शंका नाही. आताच्या घडीला आम्ही सराव आणि फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत", असे सुनील कुमारने सांगितले.
सुनील कुमारने खाल्ला सर्वाधिक 'भाव'
सुनील कुमार पुढे म्हणाला की, बचावपटू म्हणून मी काही वेगळी योजना केली नाही. पण, कोणत्या संघाविरुद्ध सामना असेल त्या हिशोबाने प्रशिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्याप्रमाणे आमचा प्रवास असेल. यू मुंबाच्या संघाने सर्वाधिक महागडा भारतीय बचावपटू (१ कोटी १५ लाख) होण्याचा मान दिला. याआधी जयपूर पिंक पँथर्सच्या संघाने ९० लाख रुपयांत खरेदी केले होते. आता मी सर्वात महागडा खेळाडू ठरल्यानने खूप मेहनत करतो आहे कारण जबाबदारी मोठी आहे. संघाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी लढत राहिन.
तसेच मी गुजरात जायंट्सकडून सर्वाधिक हंगाम खेळलो आहे. पण, आता यू मुंबात असल्यामुळे या संघाकडून जास्त काळ कसे खेळता येईल त्यासाठी प्रयत्नशील असेन. प्रो कबड्डी लीगमध्ये पुन्हा एकदा परवेश भैंसवालसोबत असल्याने आणखी बळ मिळाले आहे. यू मुंबाला अव्वल स्थानी स्वप्न बाळगून मैदानात उतरू. प्रदीप नरवाल, पवन सेहरावत हे स्टार चढाईपटू असले तरी माझ्यासाठी यातील कोणतेच आव्हान नाही असे मला वाटते. कबड्डीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रो कबड्डी लीगमुळे खेळाडूंना नाव, पैसा, ओळख सर्वकाही मिळत आहे... बाहेर कुठे गेल्यास सर्वजण ओळखतात याचा मनस्वी आनंद होतो, असे यू मुंबाचा नवनिर्वाचित कर्णधार सुनील कुमारने अधिक सांगितले.
दरम्यान, प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामाची सुरुवात येत्या १८ ऑक्टोबरपासून होणार आहे. अकराव्या हंगामातील सामने पुन्हा एकदा तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या पर्वाची सुरुवात हैदराबाद येथील गच्चीबाउली स्टेडियम येथून १८ ऑक्टोबरपासून होणार असून त्यानंतर या लीगचा दुसरा टप्पा नोएडा येथील नोएडा इंडोर स्टेडियम येथे १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर, तिसरा टप्पा पुणे येथे बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम या ठिकाणी ३ डिसेंबर २०२४ पासून रंगणार आहे. खरे तर प्ले ऑफच्या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण जाहीर केले जाईल.