बिनधास्त खेळा, नवे विक्रम नोंदवा! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खेळाडूंना शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 09:02 AM2022-07-21T09:02:19+5:302022-07-21T09:02:57+5:30
पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंना आपल्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले.
नवी दिल्ली: ‘खेळताना पदकाचे कोणतेही दडपण न घेता खेळा, बिनधास्त होऊन खेळा, नवे विक्रम नोंदवा. समोर कोणता प्रतिस्पर्धी आहे याचा विचार न खेळता मनमोकळेपणे खेळा,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना विश्वास दिला.
२८ जुलैपासून रंगणाऱ्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंशी मोदी यांनी बुधवारी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचीही उपस्थिती होती.
‘स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करत देशाला सर्वोत्तम भेट देण्याच्या निर्धाराने स्पर्धेत सहभागी व्हा,’ असेही मोदी यांनी खेळाडूंना सांगितले. मोदी यांनी पुढे सांगितले की, ‘देशात स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षाचा आनंद साजरा होत असताना, तुम्ही राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्त्व करण्यास जात आहात. यानिमित्ताने तुम्ही देशाला सर्वोत्तम कामगिरीची भेट द्याल, असा विश्वास आहे. हेच लक्ष्य ठेवून मैदानात उतरल्यास समोर कोण आहे, याने काहीच फरक पडणार नाही.’
मोदी म्हणाले की, ‘मोकळेपणे बिनधास्त होऊन खेळा. कोणतेही दडपण न घेता पूर्ण योगदान द्या. मैदान बदलले आहे, वातावरण बदलले आहे, पण लक्ष्य बदलले नाही. तुमची जिद्द बदलली नाही. तिरंगा फडकावण्याचे लक्ष्य कायम आहे. राष्ट्रगीताची धून आपल्याला ऐकायची आहे.’
प्रत्यक्ष भेटीचे निमंत्रण!
पंतप्रधान मोदी यांनी खेळाडूंना आपल्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले. मोदी म्हणाले की, ‘तुम्ही विदेशात सराव करत असतात आणि मी संसदीय कामकाजात व्यस्त असतो. त्यामुळे प्रत्यक्षात आपली भेट होत नाही. पण मी आश्वासन देतो की, जेव्हा तुम्ही राष्ट्रकुल स्पर्धेतून मायदेशी परताल, तेव्हा आपण विजयाचा आनंद साजरा करू.’