खेळाडूंच्या पोशाखाची घोषणा गुलदस्त्यात
By Admin | Published: May 29, 2016 12:17 AM2016-05-29T00:17:51+5:302016-05-29T00:17:51+5:30
रिओ आॅलिम्पिकचे आयोजन आगामी ५ आॅगस्टपासून होत आहे. त्यासाठी अनेक देशांनी आपल्या पथकाच्या अधिकृत पोशाखाची घोषणा देखील केली. पण भारतीय पथकाच्या अधिकृत
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकचे आयोजन आगामी ५ आॅगस्टपासून होत आहे. त्यासाठी अनेक देशांनी आपल्या पथकाच्या अधिकृत पोशाखाची घोषणा देखील केली. पण भारतीय पथकाच्या अधिकृत पोशाखाचा अद्याप पत्ता नाही. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
भारतीय आॅलिम्पिक संघटनेला लिहिलेल्या पत्रात भारतीय खेळाडूंच्या पोशाखाचा मुद्दा बत्रा यांनी उपस्थित केला असून मार्चपास्टच्यावेळी भारतीय खेळाडूंना ड्रेस देण्याचा निर्णय घेण्यात आला की नाही, अशी विचारणा केली. या पत्रात बत्रा पुढे म्हणतात,‘आॅलिम्पिकला आता ६८ दिवस उरले आहेत. भारतीय हॉकी संघ रिओला चार आठवडे आधीच अर्थात आॅलिम्पिक सुरू होण्याच्या २८ दिवस आधीच पोहोचेल. हॉकीपटूंना अधिकृत ड्रेस मिळण्यास ४० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या ४० दिवसांत महिला हॉकी संघ भारताबाहेरच दौऱ्यावर असेल. पुरुष व महिला हॉकी संघाला आयओए लवकर अधिकृत ड्रेस देणार असेल तर फार बरे होईल.
खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हॉकीपटूंसाठी सूट, शर्ट आणि औपचारिक जोडे तयार केले आहेत. हे साहित्य सर्वच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला देण्यात आले. हॉकी इंडियाने स्वखर्चाने ही उपाययोजना केली आहे. हे साहित्य खेळाडूंना देण्यात आले असल्याने आयओएने ऐनवेळी ड्रेस दिला नाही तरी नामुष्की टाळण्यासाठी हा पर्यायी मार्ग निवडण्यात आला.’
बत्रा पुढे म्हणाले,‘आयओएत मतभेद असल्याने फाईल्स चेन्नई व दिल्लीत सारख्या प्रवास करीत असतात. पदाधिकारी एकत्र बसण्यास तयार नाहीत. आयओएने दिल्लीत एकत्र बैठक घेत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत असा आयओएला माझा आग्रह आहे.’
कठोर मेहनत घेत आॅलिम्पिकची पात्रता गाठणाऱ्या खेळाडूंच्या भावनांचा विचार करण्याची गरज व्यक्त करीत बत्रा म्हणाले,‘देशाची प्रतिष्ठा आणि खेळाडूंच्या भावनांचा आदर करीत एकमेकांमध्ये भांडत न बसता आॅलिम्पिक समितीने चोख काम करावे.’ खासगीतील कामे आॅगस्ट २०१६ पर्यंत दूर ठेवली जाऊ शकतात, असा आयओए पदाधिकाऱ्यांना टोला हाणून चांगल्या व सकारात्मक विचारामुळे देशहित साधले जाईल, अशी आशा बत्रा यांनी व्यक्त केली.(वृत्तसंस्था)