धक्कादायक.... प्रशिक्षकांना घाबरून संघातील खेळाडूंनी केले मुंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:25 PM2019-01-21T16:25:26+5:302019-01-21T16:26:55+5:30
संघातील खेळाडूंनी प्रशिक्षकांना घाबरून मुंडन केल्याची घटना घडली आहे.
नवी दिल्ली : प्रशिक्षक संघाचा सर्वात मोठा आधार असतो. प्रशिक्षक बऱ्याचदा खेळाडूंना सांभाळून घेतात, त्यांची कारकिर्द घडवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू कसे पोहोचतील आणि नेत्रदीपक कामगिरी कशी करतील, याकडे प्रशिक्षकांचे लक्ष असते. पण काही वेळा प्रशिक्षक एवढे कडक असतात की, संघातील खेळाडू त्यांना घाबरून असतात. अशीच एक गोष्ट भारतात पाहायला मिळाली आहे. भारताच्या एका संघातील खेळाडूंनी प्रशिक्षकांना घाबरून मुंडन केल्याची घटना घडली आहे.
ही गोष्ट घडली आहे बंगालमध्ये. बंगालचा ज्युनिअर हॉकी संघ राष्ट्रीय स्पर्धेत खेळायला गेला होता. जबलपूरमध्ये झालेल्या या स्पर्धेत बंगालच्या ज्युनिअर हॉकी संघाला पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील संघाच्या कामगिरीवर प्रशिक्षक आनंद कुमार नाराज होते. सामन्याच्या पहिल्याच सत्रात झालेला बंगालचा खेळ त्यांना पसंत पडला नव्हता. त्यामुळे मध्यंतरामध्ये जेव्हा खेळाडू थोडीशी विश्रांती घेत होते, तेव्हा आनंद कुमार यांनी सांगितले की, " जर हा सामना तुम्हा गमावला तर तुमचे मुंडन केले जाईल." त्यानंतर बंगालने हा सामना गमावला आणि खेळाडूंनी प्रशिक्षकांच्या ओरडण्यानंतर स्वत:हून मुंडन केले.
याबाबत प्रशिक्षक आनंद कुमार यांनी सांगितले की, " मी सामन्याच्या मध्यंतरामध्ये ओरडलो होतो. पण असे काही बोलल्यावर ते चांगला खेळ करतील, असे मला वाटले होते. जे मी बोललो ते चांगल्या कामगिरीसाठी बोललो, ते सत्यात मी उतरवणार नव्हतो. त्यामुळे आता त्यांनी जे केले आहे त्याच्याशी माझा संबंध नाही."