खेळाडू - प्रशिक्षकांसाठी ‘अॅप’ तयार करणार
By admin | Published: September 26, 2016 03:22 AM2016-09-26T03:22:20+5:302016-09-26T03:22:20+5:30
‘खेळाडू- प्रशिक्षकांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना(एमबीए) अॅपची निर्मिती करणार असून
मुंबई : ‘खेळाडू- प्रशिक्षकांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना(एमबीए) अॅपची निर्मिती करणार असून, पुढील आठवड्यापासून हे अॅप कार्यान्वित होईल,’ अशी माहिती एमबीए अध्यक्ष अरुण लखानी यांनी दिली. रविवारी मुंबईत झालेल्या एमबीएच्या ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लखानी बोलत होते.
बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षकांना विविध स्पर्धांचा माहिती मिळण्यासाठी नवीन सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात येणार आहे. या माध्यमाने स्पर्धांच्या प्रवेशिका आॅनलाइन भरता येणार असून, सर्व स्पर्धांसाठी एक आॅनलाइन फॉर्म पुरेसा ठरेल, तसेच वेळोवेळी ‘ई-मेल-एसएमएस’मार्फत अपडेट देणार असल्याची माहिती संघटनने दिली.
आगामी वर्षात राज्यातील पायाभूत सोयी - सुविधांवर भर देणार असल्याची माहिती देताना लखानी म्हणाले, ‘सरकारच्या मदतीने ३ वर्षांमध्ये २ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन अकादमीची स्थापना करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी खेळाडूंना किमान ३ ते ५ वर्षांचा कालावधी देणे गरजेचे आहे. या काळात खेळाडूंना आर्थिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यासह, सरकारी आणि खासगी कंपन्याची मदत घेण्यात येईल.’ (क्रीडा प्रतिनिधी)