धोनीविरुद्ध खिलाडूवृत्तीने खेळू : सुरेश रैना
By admin | Published: December 16, 2015 03:40 AM2015-12-16T03:40:20+5:302015-12-16T03:40:20+5:30
महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना हे भारतीय क्रिकेट संघातील जिवाभावाचे मित्र. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. आयपीएलच्या गेल्या ८ पर्वांत दोघेही चेन्नई सुपरकिंग्ससाठी
राजकोट : महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना हे भारतीय क्रिकेट संघातील जिवाभावाचे मित्र. दोघांनाही एकमेकांशिवाय करमत नाही. आयपीएलच्या गेल्या ८ पर्वांत दोघेही चेन्नई सुपरकिंग्ससाठी एकत्र खेळले; पण या संघावर बंदी येताच यंदा नवव्या पर्वात दोघांनाही वेगवेगळ्या संघांसाठी परस्परांविरुद्ध खेळावे लागणार आहे.
रैना राजकोट संघात, तर धोनी पुणे संघातून खेळणार आहे. रैनाला या संदर्भात विचारताच तो म्हणाला, ‘‘आमच्यात स्पर्धा कायम राहील. धोनीविरुद्ध खेळताना माझ्यात खेळ भावनेची कुठलीही उणीव राहणार नाही.’’
रैना १६ आणि १९ वर्षे गटाचे अनेक सामने राजकोटमध्येच खेळला. त्याला येथील परिस्थितीची चांगली जाणीव आहे. तो म्हणतो, ‘‘राजकोटची परिस्थिती माझ्यासाठी नवी नाही. येथील परिस्थितीचा लाभ मला होईलच.’’ सहकारी रवींद्र जडेजा हादेखील यंदा राजकोटसाठी खेळणार आहे. याबाबत रैना म्हणतो, ‘‘जडेजा स्थानिक स्टार आहे. आम्हा दोघांना घरच्या परिस्थितीचा लाभ घेता येईल.’’ आयपीएलचे नववे पर्व ९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत होणार आहे. (वृत्तसंस्था)