पाकविरुद्ध खेळणे हे अन्य संघाविरुद्ध खेळण्यासारखेच - विराट कोहली
By admin | Published: May 25, 2017 01:24 AM2017-05-25T01:24:50+5:302017-05-25T01:24:50+5:30
पाकविरुद्ध खेळणे हे अन्य संघाविरुद्ध खेळण्यासारखेच असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नोंदविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याआधी कुठलाही गवगवा झाला, तरी आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पाकविरुद्ध खेळणे हे अन्य संघाविरुद्ध खेळण्यासारखेच असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने नोंदविले आहे. खेळाडूंसाठी हा ‘केवळ क्रिकेटचा एक सामना’ असेल असे कोहली म्हणाला.
गत चॅम्पियन भारताला ४ जून रोजी बर्मिंगहॅम येथे पाकिस्तानविरुद्ध सलामीचा सामना खेळायचा आहे. उभय देशांमध्ये राजकीय संबंध सध्या विकोपाला गेले आहेत. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानविरुद्ध खेळणे योग्य आहे काय, असा प्रश्न करताच कोहली म्हणाला, ‘तुम्ही काय विचार करता. तुम्ही आधीपासून डोक्यात दुसराच विचार घेऊन आला आहात, असे वाटते. एक क्रिकेटपटू या नात्याने सध्याच्या परिस्थितीत जे चालले आहे त्याकडेच लक्ष देणे गरजेचे असते. दुसऱ्या टोकावर उभा असलेल्या सहकाऱ्याबाबतही विचार करायला वेळ नसतो. आम्ही केवळ क्रिकेट खेळाबाबतच विचार करतो. भारत-पाक ही लढत चाहत्यांसाठी नेहमी रोमहर्षकतेचा विषय ठरली आहे. चाहत्यांसाठी उभय देशातील सामना काहीही असून शकतो, पण आमच्यासाठी मात्र हा एक क्रिकेट सामनाच आहे. आमच्या डोक्यात अन्य कुठलाही विचार येत नाही. अन्य संघांविरुद्ध खेळतो तसाच खेळ पाकविरुद्धही होईल. पाकविरुद्ध खेळण्याची ही काही पहिली वेळ नाही. पाकविरुद्ध खेळताना अतिरिक्त कुठलीही प्रेरणा लागत नाही.’ विश्वचषक टी-२० आणि वन डे विश्वचषकात भारताचे पाकवर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. भारतीय संघ पाकच्या तुलनेत ११-० ने पुढे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मात्र पाकिस्तानचा रेकॉर्ड भारताच्या तुलनेत सरस आहे.
अपयश जीवन-मरणाचा प्रश्न का होतो?
उपखंडातील खेळाडूंसाठी एका मालिकेत अपयशी होणे जीवनमरणाचा प्रश्न का बनते? मी कधीही स्वत:ला सिध्द करण्यासाठी खेळत नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रीया भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. ‘माझ्या मते प्रत्येक मालिकेमध्ये एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही उभारता. अनेकदा आमच्या आसपासचे वातावरण असे बनते की कोणतीही मालिका आमच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न बनते. खास करुन उपखंडातील खेळाडूंबाबत असे होते आणि असे का होते हे मला समजत नाही.’ असे कोहलीने म्हटले. त्याचप्रमाणे, ‘जर खेळाडू भारतात चांगला खेळला नाही तर, फारकाही टीका होत नाही. परंतु, भारताबाहेर खेळाडू अपयशी ठरला, तर त्याच्या गळ्यावर तलवार लटकली जाते. मी यावर विश्वास ठेवत नाही. मी काही सिध्द करण्यासाठी खेळत नाही. देशासाठी सामना जिंकणे, हेच माझे एकमेव लक्ष्य असते,’ असेही कोहलीने सांगितले.
चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान नव्या आयुधांचा वापर : आर. आश्विन
इंग्लंडमध्ये १ जूनपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेदरम्यान फिरकीत नव्या आयुधांचा वापर करणार असल्याचे संकेत दोन महिन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर ताजातवाना झालेला भारतीय संघाचा आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन याने दिले आहेत. स्थानिक सत्रात १३ कसोटी सामने खेळणाऱ्या आश्विनला आयपीएलदरम्यान विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता.