संध्याकाळपर्यंत प्रशिक्षकाचं नाव जाहीर करा, "त्रिमूर्ती"ला आदेश
By admin | Published: July 11, 2017 02:36 PM2017-07-11T14:36:00+5:302017-07-11T14:43:24+5:30
प्रशिक्षकाची निवड होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल असे वाटत असतानाच याला एक नवे वळण मिळाले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - वेळ आल्यावर आम्ही अंतिम निर्णय घेऊ. प्रशिक्षकपद निवडीबाबत आम्ही कोणतीही घाई करणार नसून सर्वांचे समान मत आम्हाला अपेक्षित आहे. कर्णधार कोहलीशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे कालत भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) सदस्य सौरभ गांगुली याने सांगितले होते. त्यामुळे प्रशिक्षकाची निवड होण्यासाठी किमान एक आठवडा लागेल असे वाटत असतानाच याला एक नवे वळण मिळाले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या(बीसीसीआय) संचालन समितीचीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सीएसी समितीला आज संध्यकाळी प्रशिक्षकची निवड करण्याचे आदेश दिले आहेत.
स्टार स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार प्रशिक्षकाचं नाव आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत जाहीर करा, असे आदेश सुप्रीम कोर्ट नियुक्त बीसीसीआयच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी दिले आहेत. क्रिकेट सल्लागार समिती म्हणजे सीएसीमध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या त्रीमुर्तींचा समावेश आहे.
सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये सीएसीने प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली. यामध्ये रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, रिचर्ड पायबस, टॉम मूडी आणि लालचंद राजपूत यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त बीसीसीआयकडे दोड्डा गणेश, लान्स क्लुसनर, राकेश शर्मा, फिल सिमन्स आणि उपेंद्रनाथ ब्रह्मचारी यांचेही अर्ज आले होते. दरम्यान, या मुलाखती प्रक्रियेमध्ये सीएसी सदस्य गांगुली आणि लक्ष्मण यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती.
शास्त्री प्रबळ दावेदार नाही?
भारताच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात मुख्य शर्यत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, आता सीएसीच्या भूमिकेनंतर असे दिसत नाही. प्रशिक्षकपदाच्या अंतिम निवडीची घोषणा पुढे ढकलणे आणि सेहवागची प्रत्यक्ष मुलाखत दोन तास रंगणे, यावरून अनेक चर्चा रंगत आहेत. विशेष म्हणजे सोमवारी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये केवळ सेहवाग एकटाच प्रत्यक्षपणे बीसीसीआय सेंटरवर उपस्थित होता. यामुळेही शास्त्री यांची पीछेहाट झाल्याची चर्चा रंगत आहे.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी विरेंद्र सेहवाग निश्चित - सूत्र
प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्री सर्वात पुढे असल्याचा अंदाज जवळपास सर्वांनीच वर्तवला होता. सोमवारी क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी पाच उमेदवारांची मुलाखत घेतली. जवळपास चार तास चाललेल्या या मॅरेथॉन सेशनमध्ये विरेंद्र सेहवाग बाकीच्या उमेदवारांवर भारी पडल्याचं चित्र आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट सल्लागार समितीला विरेंद्र सेहवागने चांगलंच प्रभावित केलं आहे. विरेंद्र सेहवागने समितीसमोर आपला पुढील 2019 वर्ल्ड कपपर्यंतचा आपला प्लान मांडला होता.