Milkha Singh: मिल्खा सिंग यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन, केली तब्येतीची विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 12:57 PM2021-06-04T12:57:47+5:302021-06-04T12:58:20+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी मिल्खा सिंग लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. याशिवाय मिल्खा सिंग लवकरच आजारातून मुक्त होऊन टोकिओ ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतील, असंही मोदींनी म्हटलं आहे. मिल्खा सिंग चारच दिवसांपूर्वी कोरोनावर मात करुन मोहालीतील रुग्णालयातून घरी परतले होते. पण गुरुवारी अचानक त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळीत पुन्हा एकदा घट झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोरोनाची लागण झाल्यामुळे ९१ वर्षीय मिल्खा सिंग यांना २४ मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांची पत्नी निर्मल कौर देखील कोरोना पॉझिटिव्ह झाल्या. त्यांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं. निर्मल कौर यांच्यावर आयसीयूमध्ये अजूनही उपचार सुरू आहेत. पण मिल्खा सिंग यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर ३० मे रोजी कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.
पीजीआयचे प्रवक्ते प्रोफेसर अशोक कुमार यांनी निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. "मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना गुरूवारी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थित आहे आणि त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे," असं अशोक कुमार म्हणाले.