पंतप्रधानांचा विश्वास; टीम इंडिया जिंकणार
By admin | Published: February 13, 2015 12:42 AM2015-02-13T00:42:12+5:302015-02-13T00:42:12+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला १४ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या विश्वकप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘खेलो दिलसे, वर्ल्ड कप लाओ फिरसे’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतविजेत्या भारतीय संघाला १४ फेब्रुवारीपासून सुरू होणा-या विश्वकप स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. ‘खेलो दिलसे, वर्ल्ड कप लाओ फिरसे’ अशा शब्दांत पंतप्रधानांनी संघाला शुभेच्छा दिल्या.
आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत जेतेपद राखण्याच्या निर्धाराने दाखल झालेल्या भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना मोदी यांनी वेगवेगळा शुभेच्छा संदेश पाठविला. कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया १५ फेब्रुवारी रोजी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शैलीमध्ये कर्णधार धोनीला संदेश पाठविला, ‘‘माझ्या शुभेच्छा, कॅप्टन कुल धोनीसाठी! मेहनत करा आणि भारताला गौरवाची संधी प्रदान करा. चांगले नेतृत्व प्रदान कर. यात तू यशस्वी ठरशील, अशी मला आशा आहे.’’
पंतप्रधानांनी सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर प्रत्येक खेळाडूच्या नावाने संदेश पोस्ट केले. संघाचा उपकर्णधार विराट कोहलीला पंतप्रधानांनी संदेश पाठविला, की ‘संघाचा स्टार खेळाडू विराटला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. भारतीयांना तुझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.’ वन-डेमध्ये एका डावात सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रम नोंदविणाऱ्या रोहित शर्माला पंतप्रधानांनी म्हटले, की ‘वन-डेमध्ये दोन द्विशतकी खेळी करणारा एकमेव फलंदाज, तुझे लाखो चाहते आहेत. तू पुन्हा आम्हाला आनंद साजरा करण्याची संधी द्यावी, अशी आमची इच्छा आहे.’ (वृत्तसंस्था)