अर्ध मॅरेथॉनमध्ये कविताचा दबदबा

By admin | Published: January 19, 2015 03:52 AM2015-01-19T03:52:18+5:302015-01-19T03:55:04+5:30

नेमके असेच यंदाच्या मुंबई अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील विजेती कविता राऊतसोबत घडले. यंदाच्या स्पर्धेत तोलामोलाची एकही स्पर्धक नसल्याने अनुभवी व विजेतेपदाची प्रबळ

Poetry in the semi marathon | अर्ध मॅरेथॉनमध्ये कविताचा दबदबा

अर्ध मॅरेथॉनमध्ये कविताचा दबदबा

Next

रोहित नाईक, मुंबई
ती आली... ती धावली... आणि ती जिंकली... नेमके असेच यंदाच्या मुंबई अर्ध मॅरेथॉन स्पर्धेतील विजेती कविता राऊतसोबत घडले. यंदाच्या स्पर्धेत तोलामोलाची एकही स्पर्धक नसल्याने अनुभवी व विजेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या ‘नाशिक एक्सप्रेस’ कविता राऊतने सहजपणे विजेतेपद पटकावत गतस्पर्धेतील कसर भरून काढली. त्याचवेळी उरणच्या सुप्रिया पाटील या नवोदित धावपटूने सर्वांचे लक्ष वेधून घेताना तृतीय स्थान पटकावले, तर पुरुष गटात गतविजेत्या इंद्रजित पटेल याने अपेक्षित बाजी मारताना आपले विजेतेपद अबाधित राखले.
सकाळी बरोबर ६ वाजता वांद्रे रेक्लेमेशन येथून सुरू झालेल्या अर्ध मॅरेथॉनमध्ये सुरुवातीपासूनच कविताने आघाडी घेतली. गतविजेती सुधा सिंग यंदा पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याने कविताने विजयासाठी मिळालेल्या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा उठवताना शेवटपर्यंत कोणालाही आघाडी घेण्याची संधी दिली नाही. कविताने १:०९:५० सेकंद अशी जबरदस्त वेळ देत दिमाखात सुवर्णपदक पटकावले. गतस्पर्धेत कविताला १:२१:१५ या वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. विशेष म्हणजे गतस्पर्धेत विजेत्या सुधा सिंगने (१:१८:२४) नोदवलेल्या वेळेपेक्षा तब्बल १० मिनिटांनी कमी वेळेत कविताने शर्यत पूर्ण करीत वर्चस्व राखले.
ब्रिटनच्या एव बग्लर हिने अंतिम काही क्षणांत कविताला गाठण्याचा झुंजार प्रयत्न केला. मात्र कविताने अखेरपर्यंत आघाडी कायम राखल्याने बग्लरला १:२२:१८ अशा वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. उरणच्या सुप्रिया पाटील हिने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना १:२६:४८ अशी शानदार वेळ देत कांस्यपदक पटकावले. गतस्पर्धेत पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या सुप्रियाने यंदा अर्ध मॅरेथॉनमध्ये असलेली संधी अचूक हेरून अव्वल तीन क्रमांकांत येण्याची कामगिरी केली.
पुरुष गटात अपेक्षित निकाल लागला असला तरी विजेत्या इंद्रजित पटेलला सुवर्णपदक मिळवण्यासाठी कडवी झुंज मिळाली. अवघ्या दोन सेकंदांनी बाजी मारताना इंद्रजितने १:०८:०९ सेकंद अशी वेळ देत सुवर्णपदक निश्चित केले. लष्कराच्या अटवा भगत याने इंद्रजितला कडवी लढत देताना १:०८:११ सेकंद अशी वेळ नोंदवली. मात्र आघाडीवरील इंद्रजितला गाठण्यात अपयशी ठरल्याने अखेर त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. लष्कराच्याच गोविंद सिंग (१:०८:१४) याने कांस्यपदकावर कब्जा केला.

Web Title: Poetry in the semi marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.