पोलंडने जर्मनीला रोखले, सामना गोलशून्य बरोबरीत

By admin | Published: June 17, 2016 09:53 PM2016-06-17T21:53:36+5:302016-06-17T21:53:36+5:30

पोलंडने जबरदस्त कामगिरी करत जगज्जेत्या जर्मनीला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गोलशून्य बरोबरीत रोखण्याची कामगिरी केली.

Poland stalled Germany, match tied | पोलंडने जर्मनीला रोखले, सामना गोलशून्य बरोबरीत

पोलंडने जर्मनीला रोखले, सामना गोलशून्य बरोबरीत

Next

ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. १७ : पोलंडने जबरदस्त कामगिरी करत जगज्जेत्या जर्मनीला युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गोलशून्य बरोबरीत रोखण्याची कामगिरी केली. त्याचबरोबर अन्य एका सामन्यात उत्तर आयर्लंडने युक्रेनला २-० असे पराभूत केले.
जर्मनी व पोलंडने प्रत्येकी एक सामना जिंकला होता. या बरोबरीमुळे दोन्ही संघांचे चार गुण झाले असून, ते दुसऱ्या क्रमांकांवर आहेत. अंतिम १६ संघांत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना पुढील सामन्यात किमान एका गुणाची गरज आहे. पोलंडचा सामना युक्रेनशी, तर जर्मनीचा गटातील शेवटचा सामना आयर्लंडशी होणार आहे. युक्रेनने अद्याप गुणांचे खाते उघडले नसून, तो स्पर्धेबाहेर गेला आहे; तर आयर्लंडकडे अद्याप संधी आहे.


जर्मनीने सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या. मारियो गोएत्झेला मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आला नाही. त्याचबरोबर पोलंडची बचावफळी शुक्रवारी जास्तच मजबूत होती. सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला गोएत्झेने मारलेला हेडर गोलपोस्टच्या बाहेर गेला. आपल्या चौथ्या विजेतेपदासाठी खेळत असलेल्या जर्मनीने आपल्या नामांकित खेळाडूंना मैदानात उतरवले होते; तरीही त्यांना गोल करण्यात यश आले नाही.


जर्मनीचे मधल्या फळीतील खेळाडू सामी खेदीरा व मेसुत ओजिल यांनी चुका केल्या. उत्तरार्धात पोलंडने आक्रमक खेळ केला. पोलंडचा कर्णधार लुकास फाबियांस्कीने गोएत्झेला रोखण्याची कामगिरी केली. पोलंडलाही गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या; मात्र त्यांना गोल करण्यात यश आले नाही. त्यामुळे सामना गोलशून्य बरोबरीत सुटला.
सामनावीर ठरलेला जर्मनीचा जेरोम बोएतांग म्हणाला, ‘‘आम्ही चांगला खेळ केला नाही. आम्ही जास्त आक्रमक नव्हतो. त्यामुळे
आम्हाला बरोबरीतच समाधान मानावे लागेल. आम्ही बचाव चांगला केला; मात्र चांगले आक्रमण करू
शकलो नाही.’’ 

Web Title: Poland stalled Germany, match tied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.