उरुसानिमित्त पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:44 AM2018-01-31T00:44:23+5:302018-01-31T00:44:41+5:30
येथील ऊरुसाला बुधवारपासून प्रारंभ होत असून या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील ऊरुसाला बुधवारपासून प्रारंभ होत असून या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन करण्यात आले.
परभणी येथील ऊरुस देशभरात प्रसिद्ध असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात. ३१ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या काळात हा ऊरुस भरतो. उरुसात होणारी गर्दी लक्षात घेऊन भूरट्या चोºया होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दर्गा परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावला आहे. या ठिकाणी पोलीस चौकीची उभारणी करण्यात आली आहे. २०० होमगार्ड, ५०० पोलीस कर्मचारी आणि ५० पोलीस अधिकाºयांची बंदोबस्तकामी नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कोतवाली पोलीस ठाण्यापासून ते दर्गापर्यंत पथसंचलन करण्यात आले. यावेळी प्रमुख रस्त्यावर झालेली अतिक्रमणेही हटविण्यात आली. दर्गा परिसरात अनाधिकृतरित्या लावलेली दुकानेही काढून घेण्यात आली. ऊरुस काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यापूर्वीच १९ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच दर्गा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्तही वाढविण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी दिली.
यंदा प्रथमच सीसीटीव्हीची नजर
यावर्षी प्रथमच संपूर्ण ऊरुस परिसर सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार आहे. मुख्य दर्गा तसेच गर्दीच्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दर्गा परिसरातील पोलीस चौकीत नियंत्रण कक्षही उभारण्यात आला आहे. दरवर्षी ऊरुसामध्ये लहान मुले हरविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी पोलीस चौकी परिसरात मोठा स्क्रीन लावला असून पोलिसांना सापडलेला मुलगा प्रत्यक्ष स्क्रीनवर दाखविला जाणार आहे. त्यामुळे हरवलेली मुले पालकांपर्यंत पोहचविण्याचे काम सोयीचे होणार आहे.
आजपासून उरुसास प्रारंभ
हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसाला ३१ जानेवारीपासून प्रारंभ होत असून प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून परभणीतील ऊरुस देशभरात ओळखला जातो. या वर्षाचे हे १११ वे वर्ष असून बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोईगल्ली येथून गुसलची मिरवणूक काढली जाणार आहे. भोईगल्लीतील नसीर अहेमद खान यांच्याकडे या मिरवणुकीचा मान आहे. नसीर अहेमद खान यांच्या घरापासून निघालेली ही मिरवणूक स्टेशन परिसरातील जिल्हा वक्फ कार्यालयात पोहचते. या ठिकाणाहून शहरातील प्रमुख मार्गांवरुन दर्गा येथे ही मिरवणूक वाजत-गाजत नेली जाते. हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या दर्गा परिसरात धार्मिक विधी पार पडल्यानंतर उरुसाला रितसर प्रारंभ होतो.