महिला अॅथलिटच्या आत्महत्येचा तपास पोलीस यंत्रणा करेल
By admin | Published: May 10, 2015 04:25 AM2015-05-10T04:25:55+5:302015-05-10T04:26:10+5:30
केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) केंद्रातील महिला खेळाडूंच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे.
नवी दिल्ली : केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) केंद्रातील महिला खेळाडूंच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे. या कायदेशीर प्रक्रियेमध्ये मी हस्तक्षेप करणार नाही; परंतु या प्रकरणात काही तरी शंकास्पद घडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या साईचे महानिदेशक इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले. श्रीनिवास हे या घटनेची माहिती घेण्यासाठी अलपुझाला गेले होते. आपला अहवाल ते क्रीडामंत्र्यांना सादर करणार आहेत. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून ‘साई’च्या ४ अॅथलिटनी विषारी फळे खाल्ली होती. यात अपर्णा रामभद्रन हिचा मृत्यू झाला, तर इतर तिघींवर उपचार सुरू आहेत. त्यांंची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
श्रीनिवास म्हणाले, ‘‘काही तरी शंकास्पद घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुलींनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे उत्तर कायदायंत्रणा देऊ शकेल. मी क्रीडामंत्र्यांच्या सूचनेवरून घटनेची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मी त्यांना अहवाल सादर करणार आहे. त्यावर काय करायचे, याचा निर्णय क्रीडामंत्री घेतील.’’
श्रीनिवास पुढे म्हणाले, ‘‘अपर्णाची मृत्युपूर्व जबानी, प्रत्यक्ष आत्महत्येची घटना, इतर वाचलेल्या मुलींचे जबाब आणि साई सेंटरवरील इतर प्रशिक्षणार्थींचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. याबद्दल मी बोलू शकत नाही. ते आमचे नाही, तर पोलिसांचे काम आहे. या प्रकरणात अनेक चौकशी यंत्रणा, पोलीस यंत्रणा, मानवाधिकार आयोग आदी गुंतले आहेत; त्यामुळे मी त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. आतापर्यंतच्या चौकशीत आत्महत्येच्या कारणाचा शोध लागलेला नाही.’’(वृत्तसंस्था)