उत्तर आयर्लंडला नमवून पोलंडची विजयी सलामी
By admin | Published: June 14, 2016 03:58 AM2016-06-14T03:58:15+5:302016-06-14T03:58:15+5:30
स्टार स्ट्रायकर अर्कादियुज मिलिक याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना पोलंडने उत्तर आयर्लंडला १-० असे नमवून यूरो कप फुटबॉल
लिली (फ्रान्स) : स्टार स्ट्रायकर अर्कादियुज मिलिक याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना पोलंडने उत्तर आयर्लंडला १-० असे नमवून यूरो कप फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच यूरो चषक स्पर्धेत
खेळत असलेल्या उत्तर आयर्लंडची सुरुवात पराभवाने झाली. अन्य एका सामन्या जगज्जेत्या जर्मनीने दिमाखात विजयी कूच करताना युक्रेनला २-० असे पराभूत केले.
पदार्पण करणाऱ्या उत्तर आयर्लंडने जबरदस्त सुरुवात करताना पोलंडला पहिल्या सत्रामध्ये चांगलेच झुंजवले. यावेळी पोलंडनेही बचावात्मक
पवित्रा घेतल्याने मध्यंतराला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. दुसऱ्या सत्रात मात्र पोलंडने आक्रमक चाली रचताना उत्तर आयर्लंडवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला.
यामुळे उत्तर आयर्लंडकडून काही चुकाही झाल्या आणि त्याचा अचूक फायदा उचलताना पोलंडने ५१व्या मिनिटाला १-० अशी आघाडी घेतली. मिलिकने यावेळी उत्तर आयर्लंडच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारताना जोरदार किक मारुन संघाला आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी निर्णायक ठरविताना पोलंडने अखेरपर्यंत सामन्यावर नियंत्रण मिळवीत विजयी सलामी दिली.
त्याचवेळी दुसरीकडे बलाढ्य जर्मनीने आपल्या लौकिकानुसार विजय मिळवताना युक्रेनचा २-० असा पाडाव केला. श्कोड्रान मुस्ताफी आणि बास्टियन श्वेनस्टीइगर यांचा
शानदार खेळ जर्मनीच्या विजयात निर्णायक ठरला. युक्रेनचे कडवे आव्हान उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर पार करताना जर्मनीने ‘सी’ ग्रुपमधून विजयी कूच केली.
बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या मुस्ताफीने १९व्या मिनिटाला आक्रमक गोल करताना जर्मनीला १-० असे आघाडीवर नेले. यावेळी पिछाडीवर पडलेल्या युक्रेनने भक्कम बचाव करताना अखेरच्या क्षणापर्यंत जर्मनीला दुसरा गोल करण्यापासून रोखले होते.
मात्र, अनुभवी श्वेनस्टीगरने ९०व्या मिनिटाला अप्रतिम गोल करून संघाची आघाडी २-० अशी करून युक्रेनच्या पराभवावर शिक्का मारला. दरम्यान, जर्मनीच्या विजयात गोलरक्षक मॅन्युअल नियुएर याचा खेळही निर्णायक ठरला. त्याने तीन शानदार गोल अडविताना युक्रेनच्या आव्हानातली हवा काढली. (वृत्तसंस्था)