पॉन्टिंग म्हणतो, विराट कोहली वनडेतील सर्वोत्तम फलंदाज!
By admin | Published: February 7, 2017 04:09 PM2017-02-07T16:09:13+5:302017-02-07T16:09:13+5:30
भारतीय संघाचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रिकी पॉन्टिंगने भारताचा कर्णधार विराट कोहलीची
Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 7 - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि भारतीय संघाचा एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रिकी पॉन्टिंगने भारताचा कर्णधार विराट कोहलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. विराट हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे पॉन्टिंगने म्हटले आहे.
सिडनी मॉर्निंग हेरॉल्डशी बोलताना पॉन्टिंग म्हणतो, "विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे का, तर हो, नक्कीच तो सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. तसा तो गेल्या सहा सात महिन्यांपूर्वीही महानच होता. पण या काळात त्याने आपल्या यशाचे नवे मानदंड कायम केले आहेत."
सरलेल्या 2016 या वर्षात विराटने कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात धमाकेदार कामगिरी केली होती. त्याचे कुशल नेतृत्व आणि फलंदाजीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड अशा संघांविरुद्ध भारताने कसोटी मालिका जिंकल्या होत्या.
असे असले तरी विराटला आताच कसोटीतील महान फलंदाज म्हणता येणार नाही, असे पॉण्टिंगने सांगितले. "त्याला आताचा सर्वोत्तम ठरवणे घाईचे ठरेल, तो सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज आहे. कसोटीत सध्या त्याला महान म्हणता येणार नाही. सचिन, लारा, कॅलिससारख्या शंभरहून अधिक कसोटी खेळलेल्या खेळाडूंची महान या श्रेणीत गणना होते, विराटने त्याच्या निम्मे सामनेही अद्याप खेळलेले नाहीत."