पॉन्टिंगची सकारात्मकता मुंबई इंडियन्ससाठी उपयुक्त : हरभजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2015 12:37 AM2015-04-21T00:37:28+5:302015-04-21T00:37:28+5:30

संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची सकारात्मक वृत्ती व शांतचित्त स्वभाव कठीण परिस्थितीत संघाला एकसंध राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे

Ponting's positivity for Mumbai Indians: Harbhajan | पॉन्टिंगची सकारात्मकता मुंबई इंडियन्ससाठी उपयुक्त : हरभजन

पॉन्टिंगची सकारात्मकता मुंबई इंडियन्ससाठी उपयुक्त : हरभजन

googlenewsNext

बंगळुरू : संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची सकारात्मक वृत्ती व शांतचित्त स्वभाव कठीण परिस्थितीत संघाला एकसंध राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केली. चार सामन्यांनंतर पराभवाची मालिका खंडित करण्यात यश आल्यामुळे हरभजनने समाधान व्यक्त केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रविवारी १८ धावांनी विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना हरभजन म्हणाला, ‘‘पॉन्टिंग सकारात्मक व्यक्ती आहे. त्याने कारकिर्दीत अशाच प्रकारचा खेळ केला. विजय मिळविला किंवा पराभव स्वीकारावा लागला तरी पॉन्टिंग नेहमी सकारात्मक असतो. तो प्रत्येकाला शंभर टक्के योगदान देण्याचा सल्ला देतो आणि खेळाडू सध्या त्यासाठी प्रयत्नशील आहेत.’’
हरभजन पुढे म्हणाला, ‘‘संघाला गेल्या चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला; पण पॉन्टिंगने मात्र संयम कायम राखला. पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली उन्मुक्त चंदसारख्या अनेक युवा खेळाडूंना शानदार क्रिकेटपटू म्हणून छाप सोडण्यास मदत मिळेल.’’
‘‘पॉन्टिंगव्यतिरिक्त मेंटर म्हणून अनिल कुंबळे व सचिन तेंडुलकर संघाच्या दिमतीला आहेत. त्यांची मोलाची मदत होते,’’ असेही हरभजन म्हणाला.
हरभजनने सांगितले की, आमच्याकडे अनिल कुंबळे व सचिन तेंडुलकर आहेत. ड्रेसिंग रूममध्ये मोठा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला संघासाठी योगदान देण्यास मदत मिळते. मी गेल्या दोन सत्रांतील कामगिरीबाबत समाधानी असून कामगिरीत सातत्य राखले तर भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरेन.’’
हरभजन पुढे म्हणाला, ‘‘यंदाच्या आयपीएलमध्ये मला विकेट मिळत आहेत. गेल्या मोसमातही माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. मी सर्वाधिक बळी घेणारा फिरकीपटू होतो. मी नेट््समध्ये घाम गाळणे कायम ठेवणार आहे. फलंदाजी व गोलंदाजीमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलो तर पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे.’’
आयपीएलमधील १०० वा सामना खेळण्याबबात बोलताना हरभजन म्हणाला, की ही मोठी उपलब्धी आहे. अशी कामगिरी करणारा हरभजन चेन्नई सुपरकिंग्सच्या सुरेश रैनानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Ponting's positivity for Mumbai Indians: Harbhajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.