पूनम राऊतचे शतक व्यर्थ

By Admin | Published: July 13, 2017 12:42 AM2017-07-13T00:42:28+5:302017-07-13T00:42:28+5:30

मुंबईकर पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिताली राजच्या ४९ व्या अर्धशतकानंतरही भारताला महिला विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य आॅस्टे्रलियाविरुद्ध ८ विकेटने पराभव पत्करावा लागला

Poonam Raut's century was in vain | पूनम राऊतचे शतक व्यर्थ

पूनम राऊतचे शतक व्यर्थ

googlenewsNext


ब्रिस्टॉल : मुंबईकर पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिताली राजच्या ४९ व्या अर्धशतकानंतरही भारताला महिला विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य आॅस्टे्रलियाविरुद्ध ८ विकेटने पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २२६ धावा उभारल्यानंतर, आॅस्टे्रलियाने केवळ दोन फलंदाजांच्या मोबदल्यात ४५.१ षटकांत विजयी लक्ष्य पार केले.
कंट्री ग्राऊंड येथे झालेल्या या सामन्यात आॅस्टे्रलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. अडखळत्या सुरुवातीनंतर भारताने पूनम आणि मितालीच्या जोरावर समाधानकारक मजल मारली.
दरम्यान, मितालीने शानदार अर्धशतक झळकावताना महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६ हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान मिळवला. मितालीने या वेळी इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्ड्सचा ५,९९२ धावांचा विक्रम मोडला.
धावांचा पाठलाग करताना आॅस्टे्रलियाने सावध सुरुवात केल्यानंतर दमदार फटकेबाजी केली. कर्णधार मेग लॅनिंगच्या नाबाद ७६ धावांच्या जोरावर आॅस्टे्रलियाने ४५.१ षटकांत २ बाद २२७ धावा केल्या. बेथ मुनी (६८ चेंडंूत ४५ धावा) आणि एलीस पेरी (६७ चेंडंूत नाबाद ६०) यांनीही दमदार फलंदाजी करत आॅस्टे्रलियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. भारतीयांनी गोलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन केले, परंतु धावांचे पाठबळ कमी असल्याने त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. तत्पूर्वी, सलामीवीर स्मृती मनधना (३) झटपट परतल्यानंतर पूनम आणि मिताली यानी १५७ धावांची भागीदार करून भारताला सावरले. परंतु, यासाठी या दोन्ही खेळाडूंनी संथ फलंदाजी केल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मिताली राज ११४ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ६९ धावा काढून बाद झाली, तेव्हा भारताच्या ४०.३ षटकांत १६६ धावा झाल्या होत्या. यानंतर, स्थिरावलेली पूनम शतक झळकावून बाद झाली. तिने १३६ चेंडंूत ११ चौकारांसह आपली खेळी सजवली. दरम्यान, हरमनप्रीत कौरने (२२ चेंडंूत २३ धावा) धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती बाद झाल्यानंतर डेथ ओव्हर्समध्ये भारताचे फलंदाज अपयशी ठरले. (वृत्तसंस्था)
पूनमच्या खेळीचा अभिमान आहे. तिने खरंच सुंदर फलंदाजी केली. पण, भारत पराभूत झाल्याची खंत अधिक आहे. पहिल्या डावापर्यंत पूनमच्या शतकाचा खूप आनंद होता. भारताच्या विजयात तिची खेळी महत्त्वाची ठरेल अशी आशा होती. परंतु, दुर्दैवाने भारताचा पराभव झाला. त्यामुळे तिच्या शतकाचा आनंद क्षणिक ठरला. आता, पुढील न्यूझीलंडविरुध्द विजय मिळवून भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल अशी देवाकडे प्रार्थना करतो.
- गणेश राऊत (पूनमचे वडील)
>धावफलक :
भारत : ५० षटकांत ७ बाद २२६ धावा (पूनम राऊत १०६, मिताली राज ६९; एलीस पेरी २/३७, मेगन स्कट २/५२) पराभूत वि. आॅस्टे्रलिया : ४५.१ षटकात २ बाद २२७ धावा (मेग लॅनिंग नाबाद ७६, एलीस पेरी नाबाद ६०; पूनम यादव १/४६)

Web Title: Poonam Raut's century was in vain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.