रोनाल्डोचा गोल सिद्ध करण्यासाठी पुरावे देण्याची पोर्तुगालची तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:41 AM2022-11-30T05:41:12+5:302022-11-30T05:41:42+5:30
फ्री किक... थेट कतारहून
अभिजीत देशमुख
दोहा : ख्रिस्टियानो रोनाल्डोने सोमवारी उरुग्वेविरुद्ध पहिला गोल केला हे सिद्ध करण्यासाठी पोर्तुगालने फिफाला पुरावे देण्याची तयारी केली आहे. फर्नांडो सँटोसच्या संघाने लुसैल स्टेडियमवर २-० असा विजय मिळवताच पोर्तुगालने अखेरच्या १६ संघात स्थान निश्चित केले. सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार ब्रुनो फर्नांडिसने दोन्ही गोल केल्याची अधिकृत नोंद झाली आहे.
पहिला गोल मात्र वादग्रस्त होता. रोनाल्डोने नव्हे तर फर्नांडिसने चेंडू गोलजाळीत टाकला, असे फिफाला वाटते. रोनाल्डोचा चेंडूशी संपर्कच झाला नाही, असा निष्कर्ष निघाला आहे. फिफाच्या निर्णयावर पोर्तुगाल निराश असून रोनाल्डो युसेबियोसह देशाचा संयुक्त- विक्रमी स्कोअरर बनण्यापासून फक्त एक गोल दूर आहे. ३७ वर्षांच्या रोनाल्डोचा हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. त्यामुळे हा सन्मान हिरावून घेतला जाऊ शकतो, असे पोर्तुगालला वाटते. गोल रोनाल्डोचाच होता हे सिद्ध करण्यासाठी पोर्तुगीज एफए फिफाकडे पुरावे सादर करणार आहेत. त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत? ते फिफाचे कॅमेरे खोडून काढण्यासाठी पुरेसे असतील? यावर अंतिम निर्णय कधी होईल, हे स्पष्ट नाही. दरम्यान, सामना संपल्यानंतर फर्नांडिस म्हणाला, ‘तो रोनाल्डोचा गोल होता. त्याने चेंडूला स्पर्श केला, असे मला वाटले.’