पोर्तुगालपुढे क्रोएशियाचे आव्हान
By admin | Published: June 25, 2016 02:41 AM2016-06-25T02:41:30+5:302016-06-25T02:41:30+5:30
मोक्याच्यावेळी फॉर्ममध्ये आलेल्या स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पोर्तुगालला युरो कप स्पर्धेबाहेर जाण्यापासून वाचविले खरे; मात्र अव्वल १६ संघांतून आगेकूच करण्यासाठी आता
लेन्स (फ्रान्स) : मोक्याच्यावेळी फॉर्ममध्ये आलेल्या स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पोर्तुगालला युरो कप स्पर्धेबाहेर जाण्यापासून वाचविले खरे; मात्र अव्वल १६ संघांतून आगेकूच करण्यासाठी आता त्यांच्यासमोर आव्हान असेल ते झुंजार क्रोएशियाचे. विशेष म्हणजे या संघाला पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नांडो सांतोस यांनी ‘शार्क’ असे म्हटले असल्याने, या शार्कची शिकार करण्यात पोर्तुगालला यश येते की नाही याकडे सर्व फुटबॉलप्रेमींची उत्सुकता लागली आहे.
हंगेरीविरुद्ध झालेल्या ३-३ अशा शानदार बरोबरीमध्ये रोनाल्डो याने दमदार दोन गोल करताना पोर्तुगालसाठी निर्णायक कामगिरी केली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे यासह चार युरोपियन चॅम्पियनशीप स्पर्धेत गोल करणारा पहिलावहिला खेळाडूचा मानही रोनाल्डोने मिळविला. या बरोबरीच्या जोरावर ‘फ’ गटातून आइसलँड आणि हंगेरी नंतर तृतीय स्थानी राहताना पोर्तुगालने उप-उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश मिळविले.
त्याचवेळी दुसरीकडे क्रोएशिया पोर्तुगालला धक्का देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. शनिवारी होणाऱ्या या लढतीसाठी रियल माद्रिदचा रोनाल्डोचा सहकारी लुका मोडरिचदेखील पुनरागमन करणार असल्याने पोर्तुगालपुढे त्याचे विशेष आव्हान असेल. दुखापतीमुळे मोडरिच स्पेनविरुद्ध खेळू शकला नव्हता. (वृत्तसंस्था)
आम्ही अंतिम १६ संघांत स्थान मिळविले असून, आमचा संघ खूप चांगला आहे. ही लढत नक्कीच तुल्यबळ असेल. क्रोएशिया एक मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे चांगले खेळाडू असून, प्रत्येक संघ स्पेनला हरवू शकत नाही. आम्ही त्यांचा आदर करतो; पण आम्हालाही आमची ताकद माहीत आहे. - ख्रिस्तियानो रोनाल्डो
क्रोएशियाचा संघ एक शार्क आहे आणि त्यांच्यापासून आम्हाला सतर्क राहावे लागेल. स्पेनसारखा संघ गटात असतानाही त्यांनी गटात अव्वल स्थान पटकावले यावरूनच सर्वकाही स्पष्ट होते.
- फर्नांडो सांतोस, प्रशिक्षक, पोर्तुगाल