दोन मुष्टियोद्ध्यांना राष्ट्रीय समितीत स्थान
By admin | Published: October 19, 2016 04:33 AM2016-10-19T04:33:55+5:302016-10-19T04:33:55+5:30
निर्णयप्रक्रियेत खेळाडूंना स्थान असावे, यासाठी नवनियुक्त भारतीय बॉक्सिंग महासंघाने दोन मुष्टियोद्ध्यांना समितीत स्थान देण्याचा निर्णय घेतला
गुडगाव : निर्णयप्रक्रियेत खेळाडूंना स्थान असावे, यासाठी नवनियुक्त भारतीय बॉक्सिंग महासंघाने दोन मुष्टियोद्ध्यांना समितीत स्थान देण्याचा निर्णय घेतला आहे. महासंघाच्या आज, मंगळवारी झालेल्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंना सहभागी होणे सक्तीचे करण्याचेही सर्वानुमते ठरविण्यात आले.
बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडिया (बीएफआय)ची पहिली बैठक अजयसिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. यामध्ये समितीत दोन खेळाडूंचा समावेश असावा, असा प्रस्ताव सरचिटणीस जय कवळी यांनी मांडला. यासाठी राष्ट्रीय चॅम्पियनशिपदरम्यान निवडणुका होणार आहेत.
अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितले, की खेळाडूंची बाजू मांडण्यासाठी आणि खेळाला पुढे नेण्यासाठी दोन खेळाडूंना समितीत स्थान देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्याकडून एका खेळाडूला नामांकन मिळणार असून, यातून खेळाडू दोघांना निवडून देतील. याशिवाय राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेणे खेळाडूंसाठी सक्ती२चे करण्यात आले आहे. सहभागी न होणाऱ्या खेळाडूला राष्ट्रीय शिबिरातून बाहेर करण्यात येऊ शकते. (वृत्तसंस्था)
>राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य आहे. अतिशय अपवादात्मक परिस्थिती वगळता सर्व खेळाडूंसाठी हे बंधनकारक राहणार आहे.
- जय कवळी, सरचिटणीस,
बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडिया