कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाभदायी ठरेल - अभिनव बिंद्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:54 AM2020-04-22T00:54:36+5:302020-04-22T00:54:49+5:30
अभिनवच्या मते विदेश दौरे होणार नसल्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, कोचेस तसेच सहयोगी स्टाफ यांसारख्या मनुष्यबळ विस्तारावर भर देण्याची संधी निर्माण होणार आहे.
नवी दिल्ली : कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडाविश्वासाठी फारच लाभदायी ठरणार असल्याचा आशावाद ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केला आहे. अभिनवच्या मते विदेश दौरे होणार नसल्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, कोचेस तसेच सहयोगी स्टाफ यांसारख्या मनुष्यबळ विस्तारावर भर देण्याची संधी निर्माण होणार आहे.
कोरोना संपल्यानंतर भारतीय खेळांकडे तू कुठल्या दृष्टिकोनातून बघतोस, अशा आशयाचा प्रश्न अभिनवला विचारण्यात आला होता. क्रीडा प्रशासकांसाठी वैकल्पिक कौशल्य विकास कार्यक्रम तयार करण्यात यावा, असे सांगून अभिनव पुढे म्हणाला, ‘या कार्यक्रमामुळे खेळाडूृंसाठी दीर्घकालिन योजना अमलात येऊ शकतील. खेळात करिअर बनवू इच्छिणारे अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यासाठी पुढे काय, असा सवाल उपस्थित झाल्यास अशा खेळाडूंना पर्याय म्हणून करिअरच्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी मिळू शकतात.’
खेळाडू म्हणून स्वत:च्या अनुभवातील अनेक बाबींचा उलगडा करीत अभिनवने प्रतिभाशोध आणि विकास कार्यक्रमाला बळ देण्याचे आवाहन केले. खेलो इंडियातून उदयास आलेल्या खेळाडूंमध्ये एक टक्का उणीव राहू नये, यादृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे मत त्याने व्यक्त केले. (वृत्तसंस्था)
‘कोरोनानंतर भारताच्या क्रीडाक्षेत्रासाठी वातावरण पूरक ठरणार आहे. अनेक विदेशी स्पर्धा आणि सराव शिबिरे होणार नसल्याने उपयुक्त पायाभूत सुविधा उभारण्याची भारताकडे संधी असेल. आम्हाला स्वत:चे कोचेस आणि सहयोगी स्टाफ तयार करण्याची गरज आहे.’