वर्ल्डकपवरील टपाल तिकीट भारतात!
By Admin | Published: February 18, 2015 01:46 AM2015-02-18T01:46:28+5:302015-02-18T01:46:28+5:30
विश्वचषकाचा ज्वर चांगलाच चढायला लागलाय. या खेळावरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी क्रिकेट चाहते विविध ‘फंडे’ वापरत आहेत.
न्यूझीलंड पोस्टाचा उपक्रम : संग्रहकांसाठी अविस्मरणीय संधी
सचिन कोरडे - पणजी
विश्वचषकाचा ज्वर चांगलाच चढायला लागलाय. या खेळावरील आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी क्रिकेट चाहते विविध ‘फंडे’ वापरत आहेत. कुणी वर्ल्डकपच्या प्रतिकृतीची पूजा करतोय, तर कुणी क्रिकेटपटूंची. वर्ल्डकपची ही क्रेज ओळखून न्यूझीलंड पोस्टाने एक टपाल तिकीट काढले आहे. संग्रहकांसाठी ते अविस्मरणीय ठरू शकते. विशेष म्हणजे, न्यूझीलंड पोस्टने ते भारतीय पोस्ट खात्यालाही पाठविले आहे. गेल्या आठवड्यातच या तिकिटाचे अनावरण झाले. आता भारतातील मुख्य टपाल कार्यालयात हे स्मरणीय तिकीट उपलब्ध आहे, अशी माहिती महाराष्ट्र सर्कल डाक विभागाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल चार्ल्स लोबो
यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. लोबो यांच्याकडे महाराष्ट्राबरोबरच गोव्याचीही जबाबदारी आहे.
लोबो म्हणाले, न्यूझीलंडने पाठविलेले हे खास तिकीट आम्हाला नुकतेच मिळाले आहे. गोव्यात ३५६० तिकिटे उपलब्ध आहेत. एका तिकिटाची किंमत ४०० रुपये आहे. चार तिकिटे विकत घेतल्यास एक तिकीट मोफत देण्यात येईल. संग्रहकांसाठी ही एक चांगली संधी आहे आणि त्यास त्यांच्याकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
असे आहेत तिकीट....
या तिकिटावर विश्वचषकातील सहभागी १४ संघांच्या नावांचा समावेश एका चेंडूवर केला आहे. त्यावर विश्वचषकाचा लोगो आणि प्रत्येक देशाचा ध्वज दाखविला आहे. या तिकिटाचा उपयोग केवळ न्यूझीलंडमध्येच करता येईल. उल्लेखनीय असे की, भारतासाठी तयार केलेल्या या तिकिटावर मध्यभागी विश्वचषक दाखवला असून त्याखाली १९८३ आणि २०११ अशा दोन वेळेचा भारत चॅम्पियन असल्याचा उल्लेख आहे.