पोयसर जिमखाना, बीकेएम उपांत्य फेरीत
By Admin | Published: April 16, 2015 01:17 AM2015-04-16T01:17:03+5:302015-04-16T01:17:03+5:30
राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पोयसर जिमखाना आणि बी. के. एम. स्पोटर््स क्लब या संघांनी निर्णायक विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली.
मुंबई : ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या राज्यस्तरीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेत पोयसर जिमखाना आणि बी. के. एम. स्पोटर््स क्लब या संघांनी निर्णायक विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गुडमॉर्निंग, विजय नवनाथ या संघांनी देखील उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे.
प्रभादेवी येथील एकनाथ ठाकूर क्रीडानगरीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत मुंबईच्या पोयसर जिमखाना संघाने रंगतदार झालेल्या सामन्यात अनुभवी अमरहिंद मंडळाचे कडवे आव्हान ३६-२१ असे परतावले. पोयसरने सुरुवातीच्या काहीवेळेत वर्चस्व मिळवताना सामन्यावर नियंत्रण राखले. आरीफ सय्यद, प्रतिक ठाकूर यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर पोयसर संघाने आघाडी वाढवली. तर सिध्देश पाटीलने जबरदस्त पकडी करताना अमरहिंदच्या खेळाडूंना रोखून ठेवले. पराभूत संघाकडून रुपेश शेलार, आकाश पाटील आणि संतोष पवार यांचा प्रतिकार अखेर अपयशी ठरला.
तत्पूर्वी चुरशीच्या झालेल्या सामन्यात रायगडच्या बीकेएम क्रीडा मंडळाने मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना मुंबईच्या विजय क्लबला २८-२४ असा अनपेक्षित धक्का दिला. निर्धारीत वेळेत दोन्ही संघांनी बरोबरी साधल्याने सामना यानंतर अतिरीक्त ५-५ चढायांमध्ये खेळविण्यात आला. यामध्ये बीकेएम संघाने निर्णायक खेळ करताना बाजी मारली.मितेश पाटील, सुमित पाटील यांच्या खोलवर चढाया आणि मोहन पाटीलच्या दमदार पकडी संघाच्या विजयात निर्णायक ठरल्या. अजिंक्य कापरे, अमित चव्हाण,
सुनील मोकल यांनी संघाचा
पराभव टाळण्यासाठी अपयशी झुंज दिली.
दुसऱ्या बाजूला गुडमॉर्निंग स्पोटर््स क्लबने उपांत्य फेरी गाठताना यंग प्रभादेवी संघाचा २९-१० असा सहजपणे फडशा पाडला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात मध्यंतरालाच मोठी आघाडी घेताना गुडमॉर्निंग संघाने सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. यानंतरच्या सावधपणे खेळलेल्या सामन्यात विजय नवनाथ संघाने बाजी मारत उत्कर्ष क्रीडा मंडळाला ९-५ असे नमवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांना आजमवण्याचा प्रयत्न केला.
(क्रीडा प्रतिनिधी)
गुडमॉर्निंग स्पोटर््स क्लबने उपांत्य फेरी गाठताना यंग प्रभादेवी संघाचा २९-१० असा सहजपणे फडशा पाडला. अन्य एका सामन्यात विजय नवनाथ संघाने झुंजार बाजी मारत उत्कर्ष क्रीडा मंडळाला ९-५ असे नमवले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.