क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ‘पीपीपी’ मॉडेल उपयुक्त - विजय गोयल

By admin | Published: May 18, 2017 12:24 AM2017-05-18T00:24:33+5:302017-05-18T00:24:33+5:30

देशात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) हे मॉडेल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास गोयल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त

'PPP' model is suitable for sports development: Vijay Goel | क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ‘पीपीपी’ मॉडेल उपयुक्त - विजय गोयल

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी ‘पीपीपी’ मॉडेल उपयुक्त - विजय गोयल

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप (पीपीपी) हे मॉडेल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास गोयल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला, तसेच १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सहा स्टेडियम ३० मे पर्यंत सज्ज होतील, अशी माहितीही गोयल यांनी या वेळी दिली.
केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आगामी १७ वर्षांखालील ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी देशातील सहा स्टेडियमचा पाहणी दौरा सुरू केला आहे. बुधवारी नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमची पाहणी केल्यानंतर, गोयल यांनी मुंबई येथील ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली.
आगामी ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. ‘फिफा’ स्पर्धेसाठी गोवा, नवी दिल्ली, कोलकाता येथील स्टेडियमचा आढावा घेण्यात आला आहे. नवी मुंबई येथील पाटील स्टेडियममधील तयारी समाधानकारक असून, उर्वरित कोची आणि गुवाहाटी येथील स्टेडियमला लवकरच भेट देणार आहे, असे गोयल यांनी सांगितले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी त्या दर्जाच्या सुविधा देणे गरजेचे आहे. सुविधा पुरवताना देशात क्रीडा संस्कृतीस पोषक वातावरण निर्मिती करणे महत्त्वाचे असते. परिणामी, सरकारसोबत नागरिकांनीदेखील पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशातील क्रीडा क्षेत्रातील विकास ‘पीपीपी’ मॉडेलनुसार होणार असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांनी ‘फिफा’ स्पर्धेत विशेष स्वारस्य आहे. क्रिकेटसह फुटबॉल, हॉकी अशा अन्य खेळांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकार विविध योजना राबवणार आहेत. आगामी २०२०, २०२४ आणि २०२८ आॅलिम्पिकसाठी दिग्गज प्रशिक्षकांची टास्क फोर्स योग्य प्रकारे काम करत आहे. नॅशनल स्पोटर््स टॅलेंट मोहिमेंतर्गत ८-१२ वर्षांखालील मुलांना क्रीडापटू म्हणून तयार करण्यात येणार आहे. या टॅलेंट मोहिमेंतर्गत गाव-खेड्यांमधील मुलांवर विशेष लक्ष देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘फिफा’ विश्वचषक तिकीट फक्त ४८ रुपये !
बहुचर्चित ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेचा सर्वसामान्य प्रेक्षकांना आनंद घेता यावा, यासाठी अवघ्या ४८ रुपयांपासून तिकीट मिळणार आहे. शिवाय फुटबॉल चाहत्यांसाठी ‘फुटबॉल सेल्फी’सारखे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, असे गोयल यांनी सांगितले.

नागपूर येथे प्रादेशिक क्रीडा केंद्र
महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण यांच्यासाठी नागपूर येथे प्रादेशिक क्रीडा केंद्र मंजूर करण्यात आले आहे. १४१ एकर जागेत हे अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त प्रादेशिक क्रीडा केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती गोयल यांनी दिली.

क्रीडा संघटना, फेडरेशनसाठी नवी समिती
देशात क्रीडा संघटना आणि महासंघासाठी केंद्र सरकारच्या वतीने नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व खेळ संघटना आणि महासंघावर केंद्राची ही नवी समिती देखरेख ठेवणार आहे. संघटना आणि महासंघाच्या कर्तव्य आणि जबाबदारीत उणिवा आढळल्यास कारवाई करणार असून, क्रीडाविकासासाठी खेळाडूंसह नागरिकांना उत्तर देणे अनिवार्य आहे.

कांदिवलीचे ‘साई’ आता केंद्राच्या कक्षेत
कांदिवली येथील स्पोटर््स अ‍ॅथोरेटी आॅफ इंडिया (साई) हे केंद्र सरकारच्या कक्षेत येणार आहे. यासाठी लवकरच राज्य सरकारसोबत ‘एमओयू’ करणार आहे. त्यानंतर, तेथे क्रीडापटूंना उपयुक्त असे केंद्र उभे राहील, असे गोयल म्हणाले.

‘सरावासाठी नवी मैदाने’
फिफासाठी डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये चार चेंजिंग रुम उभारण्यात येत आहेत. संघांना सरावासाठी ३ नवी फुटबॉल मैदाने विकसित करण्यात येत आहेत.

Web Title: 'PPP' model is suitable for sports development: Vijay Goel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.