प्रभात कोळीला साहसी पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 04:53 AM2019-08-28T04:53:27+5:302019-08-28T04:53:52+5:30

नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला मंगळवारी प्रतिष्ठेचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला ...

Prabhat koli gets adventure award | प्रभात कोळीला साहसी पुरस्कार जाहीर

प्रभात कोळीला साहसी पुरस्कार जाहीर

googlenewsNext

नवी दिल्ली : नवी मुंबई येथील जलतरणपटू प्रभात कोळी याला मंगळवारी प्रतिष्ठेचा ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने ‘तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार-२०१८’ची मंगळवारी घोषणा करण्यात आली. विविध साहसी प्रकारांत एकूण ६ खेळाडूंची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. ५ लाख रुपये, स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नवी मुंबईतील नेरूळमधील १९ वर्षीय प्रभातने नुकताच दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनचा ८ कि.मी. चा समुद्र पार केला. न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट, इंग्लीश खाडी, कॅटलिना, कैवी, सुगारु, नॉर्थ चॅनल आणि जिब्राल्टरची सामुद्रधुनी असे एकूण सात खडतर टप्पे प्रभातने यापूर्वी पूर्ण केले आहेत. त्यातील काही टप्प्यांत सर्वात तरूण खेळाडू म्हणून त्याच्या नावाची नोंद झाली आहे.
कुटुंबीयांकडून प्रोत्साहन
प्रभात हा मच्छिमार कुटुंबातला असून वडील राजू कोळी मासेमारीचा व्यवसाय करतात. प्रभातने २०१२मध्ये ‘धरमतर ते गेटवे’ हे सर्व नव्या सागरी जलतरणपटूंचे प्राथमिक आव्हान सहज पार केले. वयाच्या १४व्या वर्षी त्याने ‘कासा ते खंदेरी’ हा धोकादायक सागरी पट्टा पार केला. कुटुंबीयांनी घर विकून प्रभातच्या जलतरणावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे २०१४ पर्यंत प्रभातने भारतातील काही समुद्रमार्ग पार केल्यानंतर २०१५मध्ये इंग्लिश खाडीचे आव्हान पूर्ण केले. त्याआधी, अराऊंड जर्सी हा ६६ कि.मी.चा अतिशय थंड पाण्याचा पट्टा ओलांडून पराक्रम केला.

Web Title: Prabhat koli gets adventure award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.