प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सव : दीपक, आदिती, आर्य, जीविधा यांना तिरंदाजीत प्रत्येकी तीन सुवर्णपदके
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:19 PM2018-12-07T18:19:32+5:302018-12-07T18:19:32+5:30
रिकर्व्ह राऊंड ओव्हरऑलमध्ये मुलांच्या विभागात ध्रुव देसाई (१२ वर्षाखालील), आर्यन वाबळे (१४ वर्षाखालील) आणि श्रेयस निवास्कर (१७ वर्षाखालील) तर मुलींमध्ये कृष्ण नाईक (१२ वर्षाखालील), स्वरा पटेल (१४ वर्षाखालील) आणि सुश्मिता कांबळे (१७ वर्षाखालील) असे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.
मुंबई: एम.एन. इंग्लिश हायस्कूलचा दीपक यादव आणि सेंट जोसेफ वांद्रे या शाळेची आदिती म्हात्रे यांनी ४१ व्या प्रबोधन आंतर-शालेय क्रीडा महोत्सवामध्ये चमकदार कामगिरी बजावताना तिरंदाजी या क्रीडा प्रकारामध्ये प्रत्येकी तीन सुवर्णपदके पटकावली. या दोघांनी इंडियन राऊंडमधील ओव्हरऑल तसेच ४० आणि ३० मीटर्समध्ये (१७ वर्षाखालील वयोगटात) अव्वल स्थान मिळविले. आदितीला तसे कोणतेच आव्हान नव्हते मात्र दीपकला त्याच्याच शाळेचा सुधीर साहनी याचा तिन्ही स्पर्धांमध्ये मुकाबला करावा लागला. गेली चार-पाच वर्षे तिरंदाजी हा खेळ मुंबईच्या उपनगरामध्ये बऱ्यापैकी मूळ धरू लागला आहे हे प्रबोधनच्या क्रीडांगणावर उपस्थित तिरंदाजांची शंभरावरील संख्या पाहता सिद्ध झाले.
या स्पर्धेमध्ये नानावटी विद्यामंदिरचा आर्य कुलकर्णी याने आर्य विद्यामंदिर वांद्रे या शाळेचा गुरजीव सिंघ कोहली याला इंडियन राऊंड ओव्हरऑल, ३० आणि २० मीटर्समध्ये (१४ वर्षाखालील वयोगटात) मागे टाकले व तीन सुवर्णपदके खिशात घातली. तशीच चांगली कामगिरी स्वामी विवेकानंदच्या रेयांश ठक्कर याने तीन सुवर्ण पदके मिळविताना केली. त्याने इंडियन ओव्हरऑल, २० आणि १५ मीटर्स हे तीन स्पर्धा प्रकार जिंकले. चिल्ड्रन्स अकादमी, कांदिवलीचा पूरब परमार दोन रौप्य पदकांचा मानकरी ठरला. हे दोघे १२ वर्षाखालील वयोगटात खेळले. मुलींच्या १४ आणि १२ वर्षाखालील वयोगटामध्ये अनुक्रमे जीविधा पटेल आणि मिताली निमजे यांनी तृतीय यश संपादन केले.
रिकर्व्ह राऊंड ओव्हरऑलमध्ये मुलांच्या विभागात ध्रुव देसाई (१२ वर्षाखालील), आर्यन वाबळे (१४ वर्षाखालील) आणि श्रेयस निवास्कर (१७ वर्षाखालील) तर मुलींमध्ये कृष्ण नाईक (१२ वर्षाखालील), स्वरा पटेल (१४ वर्षाखालील) आणि सुश्मिता कांबळे (१७ वर्षाखालील) असे सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. कंपाऊंड ओव्हरऑल या तिसऱ्या प्रकारात मुलांच्या विभागात हृदय शहा, क्रिश जाधव आणि स्टीव्ह फिलिप्स तर मुलींमध्ये राचेल थोमस, कोह्ना स्वामी आणि गायत्री बंदरकर यांनी अनुक्रमे १२,१४ आणि १७ वर्षाखालील वयोगटांमध्ये अव्वल स्थान पटकावले.