इंग्लंड संघाने मुंबईत ब्रेबोर्न स्टेडियमवर केला कसून सराव
By admin | Published: November 5, 2016 05:28 AM2016-11-05T05:28:13+5:302016-11-05T05:28:13+5:30
भारत दौऱ्यात मिळणाऱ्या कडव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होत असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी शुक्रवारी ब्रेबोर्न स्टेडियमवर कसून सराव केला
मुंबई : भारत दौऱ्यात मिळणाऱ्या कडव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होत असलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी शुक्रवारी ब्रेबोर्न स्टेडियमवर कसून सराव केला. इंग्लंड संघ बांगलादेश दौरा आटोपल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच भारतात डेरेदाखल झाला आहे. सराव सत्र ऐच्छिक असले तरी संघातील सर्व १६ सदस्य यात सहभागी झाले होते. त्यांनी चार तास कसून सराव केला.
संघातील सूत्रांनी सांगितले की, ‘हे ऐच्छिक सराव सत्र होते; पण ढाका येथील कसोटी सामना तीन दिवसांमध्ये संपल्यामुळे खेळाडूंना सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.’
त्याआधी, कर्णधार अॅलिस्टर कुकसह काही सदस्य सराव सत्रात सहभागी होणार होते, तर शनिवारी सर्वच खेळाडू सराव करणार होते. त्यानंतर इंग्लंड संघ राजकोटसाठी रवाना होणार आहे. राजकोटमध्ये ९ नोव्हेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.
इंग्लंड संघातील सूत्रांनी सांगितले की, ‘संघ रविवारी रवाना होणार आहे. शनिवारी पुन्हा सर्व खेळाडू सराव करणार आहेत.’ इंग्लंड संघ राजकोटमध्ये पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी दोन दिवस सराव करणार आहे. राजकोटमध्ये प्रथमच कसोटी सामना खेळला जाणार आहे.
दरम्यान, इंग्लंड संघातील सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआय आणि सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या लोढा समितीसोबत सुरू असलेला वाद इंग्लंड संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय नाही. सूत्राने सांगितले की, ‘आम्ही राजकोट कसोटीसाठी तयारी करीत असून, आम्हाला कुठली चिंता नाही.’
बीसीसीआयने इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) लिहिलेल्या पत्रामध्ये हॉटेलचे बिल आणि अन्य खर्च स्वत: करावा, असे वृत्त आहे. याबाबत विचारले असता प्रसारमाध्यमातील वृत्त फेटाळून लावले. ईसीबीने संघातील विशिष्ट धर्माच्या खेळाडूंना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यास बीसीसीआयला कळविले आहे, असेही सूत्राने सांगितले. सूत्राने पुढे म्हटले की, ‘इंग्लंड संघ हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहे. सुरक्षेबाबत चिंता नाही.’
इंग्लंडच्या फलंदाजांना येथे फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांचे आव्हान पेलावे लागणार असल्याची कल्पना आहे. त्यामुळे १२ स्थानिक फिरकीपटूंच्या गोलंदाजीवर त्यांनी कसून सराव केला. त्यात आॅफ स्पिनर, डावखुरे फिरकीपटू आणि लेग स्पिनरचा समावेश होता.
जो रुटसारखे आघाडीचे फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध स्लॉग स्विप व स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्याचा सराव करीत असल्याचे चित्र दिसले. (वृत्तसंस्था)
>राजकोट कसोटीपासून ‘डीआरएस’ला सुरुवात
>इंग्लंडचा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची मायदेशात फिटनेस चाचणी होणार आहे.
अँडरसनची पुढील २४ तासांमध्ये फिटनेस चाचणी होणार आहे. त्याच्या अहवालानंतर तो कधी फिट होईल, हे सांगता येईल. पण, तो राजकोट कसोटीत खेळणार नसल्याचे निश्चित आहे.
इंग्लंडतर्फे सर्वाधिक बळी घेणारा अँडरसन (४६३ बळी) खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे.
भारत-इंग्लंड यांच्यात ९नोव्हेंबरपासून येथे पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या सामन्यापासून पंचांच्या निर्णयाची समीक्षा करणाऱ्या ‘डीआरएस’ प्रणालीचा वापर पहिल्यांदा होईल. ‘ट्रायल’ म्हणून ‘डीआरएस’चा वापर राहील. ‘बीसीसीआय’ने दीर्घकाळापासून या प्रणालीला तीव्र विरोध केला आहे.
‘राजकोट कसोटीत ‘डीआरएस’चा वापर केला जाईल. ही एक चाचणी असेल. डीआरएसचा वापर द्विपक्षीय मालिकेत होण्याची ही पहिली वेळ आहे.’ भारतीय संघ आज, शनिवारी आणि इंग्लंड संघ उद्या, रविवारी राजकोट येथे दाखल होणार आहे.
- निरंजन शाह,
सचिव, सौराष्ट्र क्रिकेट संघटना